पान:अभिवादन (Abhivadan).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८ । अभिवादन

तिन्ही ठिकाणी पंत सरस वाटतात. माधुर्याच्या बाबतीत केवळ नादमाधुर्य पुरेसे नाही. अनुप्रासयुक्तता नादमय असते, नादमधुर नसते. माधुर्य हा शैलीचा, अनुप्रासयमक यांच्या पलीकडे जाणारा गुण असून तो मुक्तेश्वरांत अधिक आहे असे आजचे विद्वान मानतात. हे मानणे वृथा आहे हे अण्णा सिद्ध करू शकले नाहीत. मोरोपंती ओजाचा खरा आविष्कार प्रबंधाच्या बाहेर जातो, पण आहे त्या भागापुरता विचार केला तर पंतांच्या वाणीतील ओज मुक्तेश्वरांच्या मानाने जरा थिटे वाटते. याला सभापर्वातील काही भाग आणि कीचकवध व उत्तरगोग्रहण इतकेच सन्माननीय अपवाद आहेत. इतर सर्व ठिकाणी पंतांच्या संक्षेपाने त्यांच्या ओजाचाही संक्षेप केला आहे. शैलीच्या या उन्मेषात मला अण्णांचा धारवाडी काटा पंतांकडे झुकल्यासारखा वाटतो.
 पहिल्या आणि तेराव्या उन्मेषांत अनुक्रमे प्रबंधाचा उपक्रम आणि उपसंहार आहे. सर्वांगीण विचार करून त्यांनी मोरोपंतांना वरचढ ठरविले आहे. महाकाव्य हा प्रदीर्घ कथानकप्रकार असल्यामुळे कथानकरचना व स्वभावरेखन या दोन ठिकाणी एखादा कवी टिकला म्हणजे अर्धी लढाई त्याने जिंकली असे म्हणावयास हरकत नाही. मोरोपंतांचे स्वभावरेखनाचे प्रचंड सामर्थ्य, त्यांचे अजोड संवादकौशल्य मान्य करूनही कोर्टात निकाल त्यांच्यातर्फे लागला, याचे महत्त्वाचे कारण मूलानुसरणच हेच आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे मोरोपंतांच्या यशापेक्षा मुक्तेश्वरांचे अपयश एखाद्याला आवडले तर फारसा दोष देता येणार नाही. आम्हालाही मोरोपंत हेच मोठे कवी वाटतात. पण त्यांचे हे मोठेपण निरपवाद नव्हे. त्यामुळे मराठी काव्यातील मुक्तेश्वरांच्या स्थानाला फारसा धक्का पोचलेला नाही. फक्त पंतांवरील अन्याय दूर झाला आहे.
 अण्णांचा हा प्रबंध कहाळेकरांनी म्हटल्याप्रमाणे अभ्यासवृत्ती, मौलिक संशोधन, रसिक विवेचन, व्यापक विद्वता आणि निरलस साक्षेप याचा परमोत्कर्ष दाखविणारा आहे, यावर दुमत होण्याचे काहीच कारण नाही.