पान:अभिवादन (Abhivadan).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । ३७

मोरोपंतांत यमकासाठी अलंकार येतात, पण असा प्रकार कमी आहे. उभय मराठी कवींनी अचेतनावर सचेतनत्वाचे आरोप करून सर्वत्र वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यनिर्मिती केली आहे. आलंकारिकतेच्या दृष्टीने उभय मराठी कवी भारतापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांतल्या त्यांत मोरोपंत अधिक कुशल आहेत. याच प्रकरणी उत्तरगोग्रहण प्रसंगातील इंद्र या उपमानाचे अण्णांनी मोठे मार्मिक रसग्रहण केले आहे. हे रसग्रहण अलंकारांच्या दृष्टीने मोरोपंतांची भावव्यंजकता ठरविताना अति महत्त्वाचे ठरले आहे.
 अण्णांनी केलेली अलंकारांच्या मोजणीची ही प्रचंड यातायात आणि आकडेवारी खोटी ठरविणे कठीण आहे. पण काव्याच्या रसग्रहणात आकडेवारी क्वचित दिशाभूल करते. या विवेचनात मुक्तेश्वरांच्या कल्पनाविलासाचा जिवंत उत्स्फूर्तपणा आणि मोरोपंतांच्या कल्पनाविलासाचा घडीवपणा निसटला आहे. त्याकडे लक्ष गेले म्हणजे अण्णांच्या निष्कर्षाविषयी थोडीफार शंका निर्माण होतेच हे नाकारता येणार नाही.
 दहाव्या उन्मेषात अण्णांनी शैलीचा विस्तृत विचार केला आहे. हा विचार करताना मुक्तेश्वरांच्या व्याकरणवैशिष्ट्यांवरही त्यांनी आपले लक्ष वळविले आहे. या प्रकरणीचे त्यांचे निष्कर्ष असे आहेत- मुक्तेश्वर आणि मोरोपंत दोघांनीही आपली भाषा संस्कृतप्रचुर व प्रौढ ठेवली आहे. दोघांची भाषा सालंकृत आहे. मुक्तेश्वरांची शैली ठसठशीत, शब्दसौष्ठव, अर्थगांभीर्य व विविधता यांनी ओतप्रोत आहे. त्यांच्यासारखा रूपकांचा विलास मराठीत अतुल आहे. मोरोपंतांत सूक्ष्मावगाहनक्षमता, व्यापकता अधिक आहे. उपमाविलासात पंतांची सर मुक्तेश्वरांना नाही. मुक्तेश्वरांत आपल्या कवित्वशक्तीचा दर्प आहे. मोरोपंतांत लीनता अधिक आहे. व्यासांचा मागोवा घेताना मुक्तेश्वर कधी " सांगो विसरला व्यास कवि । परि म्या स्मरण दिधले," असे म्हणण्याइतके धीट होतात. तर कधी दोषांचे वेळी हे सदगुरू व्यासांचे दोष आहेत असे सांगून मोकळे होतात. मोरोपंत अति नम्र आहेत. त्यांना व्यासांची वाणी दोषातीत वाटते. मुक्तेश्वर आलेला विषय बेभानपणे रंगवीत जातात. यास्तव त्यात अश्लीलता, कालविपर्यास, अनौचित्य अधिक आहे. मोरोपंतांत हे दोष नसूनही प्रमाणबद्ध रसनिष्पत्ती अधिक आहे. दोघांचीही भाषा नादमधुर आहे. प्रसाद म्हणजे केवळ सोपेपणा इतकाच अर्थ असेल तर मुक्तेश्वरांत तो अधिक आहे. पण प्रसादाने चित्ताची पावनता वाढावी, प्रसन्नता यावी हेही गृहीत धरले तर मोरोपंतांत प्रसाद अधिक आहे. पंतांच्या वाणीत सूचकता व कुशलता अधिक आहे. मुक्तेश्वरी ओजात दाहकता आणि उद्दामपणा अधिक आहे व तोच ओजाचा गुण असतो. मोरोपंतातील ओज संयमित व संघटित आहे. ओज, माधुर्य आणि प्रसाद या गुणांचा विचार केला तर नांदापूरकरांना