पान:अभिवादन (Abhivadan).pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६ । अभिवादन

भावव्यंजक असणे हे अलंकारांचे पहिले कर्तव्य आहे. अलंकारांचे अण्णांनी केलेले विवेचन त्यांच्या प्रचंड परिश्रमाचे द्योतक आहे. मुक्तेश्वरांनी वापरलेले सर्व अलंकार आधी नोंदवायचे. मग त्यांची वर्गवारी करायची. त्यानंतर कोणकोणत्या रसांत कोणकोणते अलंकार आले आहेत याचे कोष्टक तयार करून रस व अलंकार यांचा संबंध जोडून दाखवायचा. हा सर्वच प्रयत्न अतिशय परिश्रमाचा व बारकाईचा आहे. अशी चिकित्सा त्यांनी मोरोपंतांचीही केली आहे. आणि मग आपले विवेचन आकडेवारीने सजविले आहे. मुक्तेश्वरांच्या शेंगारात ओवीसंख्या व अलंकारसंख्या तितकीच आहे. ९० रूपके, ५० उपमा, १३ अतिशयोक्ती, १० चेतनगुणोक्ती, ८ व्यतिरेक, आणि ६ उत्प्रेरक यांव्यतिरिक्त, कोष्टकात दिल्याप्रमाणे अजून २५ अलंकार तुरळक आलेले आहेत. अशी वाक्ये थोडक्यात लिहिता येतात; पण त्यासाठी आधीचे महिनोगणती परिश्रम तयार ठेवावे लागतात. अण्णांच्या या अलंकारविषयक एका उन्मेषाने त्यांचे एक संपूर्ण वर्ष खाल्ले असावे, असा माझा अंदाज आहे. या प्रकरणी त्यांचे निष्कर्ष नेमके प्रचलित विद्वानांच्या भूमिकेच्या विरुद्ध आहेत. प्रचलित भूमिका मुक्तेश्वरात आलंकारिकता आणि म्हणून कल्पनाविलास अधिक आहे असे मानते. अण्णांनी मोजून प्रमाण दिले आहे व हे मत खोटे ठरविले आहे. मुक्तेश्वरांत अलंकारांचे प्रमाण दर २२ ओव्यांत १३ व मोरोपंतांत हे प्रमाण दर १५ आर्यात १६ इतके मोठे आहे हेही त्यांनी दाखविले आहे. एकूण मिळून सर्व मुक्तेश्वरांत ४३ प्रकारचे अलंकार आढळतात. मोरोपंतांत ५९ प्रकारचे अलंकार आढळतात. त्यामुळे प्रकारविविधता मोरोपंतांत जास्त आहे. मुक्तेश्वरांचे ८ अलंकार सर्व रसांत आढळतात. तर मोरोपंताचे १७ अलंकार सर्व रसांत आढळतात. एंवंच मोरोपंतांचा कल्पनाविलास अधिक प्रगल्भ आहे, चौफेर आहे. पण अण्णांचे इतक्यावर समाधान नाही. अलंकारांचा वापर भावव्यंजकतेसाठी झाला, की वर्णन वाढविण्यासाठी झाला, हा प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. त्याही दृष्टीने सर्वमान्य मत मुक्तेश्वरांचे भावव्यंजकत्व अलंकाराने वाढलेले आहे असे मानणारे आहे. अण्णांनी हेही पुन्हा मोजून दाखविले आहे व भावव्यंजकता मोरोपंतांच्या कल्पनाविलासात अधिक आहे हे दाखवून दिले आहे. उभय मराठी कवींनी प्रायः आपला कल्पनाविलास स्वतंत्र रेखाटला हे दाखवून त्यांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा निर्देशिला आहे. या प्रकरणीचे त्यांचे निष्कर्ष असे आहेत:- मुक्तमयूर दोघांनीही गंभीर विषयाला क्षुद्र आणि क्षुद्र विषयाला गंभीर दृष्टांत दिले आहेत. त्यांत पहिला प्रकार पंतांत अधिक तर दुसरा मुक्तेश्वरांत अधिक आहे. मुक्तेश्वरांना अलंकाराचा हव्यास अधिक आहे. त्यांची आलंकारिकता कथा खंडित करणारी आहे. तीत भावनोद्योतनापेक्षा वर्णन वाढविणे अधिक आहे. मोरोपंतांत नेमके याच्या उलट आहे. त्यामुळे अलंकारांत पंतांनी गुणवत्ता अधिक दाखविली आहे.