पान:अभिवादन (Abhivadan).pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । ३५

 अण्णांनी रौद्ररसाचा स्थायीभाव क्रोध घेतल्यामुळे सामान्य कलहाचे प्रसंगही रौद्ररसाचे प्रसंग ठरले आहेत. वस्तुतः सामान्य कलह रौद्ररस प्रतीत करून देऊ शकत नाहीत. त्या क्रोधाला काही भव्य आविष्कार हवा. रौद्र आणि भयानक हे मुळातील भव्य रस आहेत. आमच्यापैकी अनेकांना अंधारात एकटे फिरण्याची भीती वाटते. अशा एखाद्या वेळी मी कॉलेजवरून जर घरी येऊ लागलो तर माझी छाती सतत धडधडत असते. मला वाटते, हा प्रसंग भयानकरसासाठी अपुरा आहे. आणि आम्ही जीवनात अनेकदा रागावतो. पुष्कळदा हा राग प्रामाणिकही असतो. पण त्या सर्व प्रसंगी रौद्ररस मानू नये. मयसभेत दुर्योधनाचा अपमान होतो. त्याला त्यामुळे अत्यंत वाईट वाटते. पांडवांच्या विषयी भलताच राग येतो. पण काळवेळ ओळखून दुर्योधन गप्प बसतो. हा प्रसंगही अण्णांनी रौद्ररसाचा गृहीत धरला आहे. रौद्ररसविषयक अण्णांची दृष्टीच मला अजून पटली नाही. त्यामुळे या प्रसंगी त्यांनी केलेले विवेचन शांतपणे मी नुसता वाचीत असतो. मुक्तेश्वरांनी रंगविलेल्या शांतरसाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. कण्वाश्रमाचे मुक्तेश्वरांनी केलेले वर्णन त्या आश्रमात किती विविध मतांचे तापसी होते याची यादी देणारे आहे; पण तात्त्विक विचारपंथांचीही नावे व त्यांच्या चर्चा यांचे त्रोटक उल्लेख आले म्हणजे शांतरस होतो हे मान्य करणे कठीण आहे. नारद धर्मराजाला अनेकविध प्रश्न विचारतो व धर्मराज त्यांची उत्तरे देतो. ही प्रश्नोत्तररूप चर्चा शांतरसाची काय म्हणून मानावयाची ? शांतरसाचा स्थायीभाव निर्वेद आहे. परिपुष्ट निर्वेदाची प्रतीती ज्या प्रसंगी येत नाही तेथील शांत रस मान्य करणे कठीण आहे. अशा रीतीने नांदापूरकरांनी केलेल्या रसविवेचनावर जागजागी शंका घेता येतील. पण रस म्हणजे नाट्यधर्मी भावांचा परिपोष, जीवनधर्मी भावांचा परिपोष नव्हे, ही भूमिका एकदा घेतली म्हणजे तपशीलवार ठिकठिकाणी विचारांतर असूनही निष्कर्षाला मोरोपंतांची रसवत्ता श्रेष्ठ आहे हे मान्य करण्यावाचून सुटका नाही. जाता जाता अजून एक प्रश्न उपस्थित करतो. बीभत्स, भयानक, शांत, अद्भुत या चार रसांत मुक्तेश्वर श्रेष्ठ असल्याचे अण्णांना मान्य आहे. शारीरश्रृंगार, युद्धवीर आणि करुण या रसांत ते मोरोपंतांच्या बरोबर आणि बहुधा कांकणभर का होईना सरस असतात हेही नांदापूरकरांना मान्य आहे. तरीसुद्धा पंतांची रसवत्ता श्रेष्ठ ठरविणे म्हणजे रसांची कसोटी, स्वभावरेखन व कथानकरचना यांना सांभाळणाऱ्या रसांची कसोटी असे समीकरण ठरते. आपल्या साहित्यशास्त्रीय परंपरेला हे समीकरण मान्य आहे काय?
 नवव्या उन्मेषात मुक्त-मयूरांच्या कल्पनाविलासांचे, अलंकारांचे तौलनिक विवेचन प्रस्तुत केले आहे. हे विवेचन करण्याच्या आधी अगदी थोडक्यात अण्णांनी अलंकारविषयक आपली भूमिका ग्रथित केली आहे. त्यांच्या मते रसपोषक असणे,