पान:अभिवादन (Abhivadan).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । २७

आहेत. मुक्तेश्वरात औचित्यभंग विपुल आहेत. कथानकरचनेत औचित्यभंग नाही असे ते सहसा घडू देत नाहीत. मोरोपंतांची औचित्यदृष्टी फार सूक्ष्म व मार्मिक आहे. एकूण मिळून विचार केला तर विभागश: मुक्तेश्वरांची परिणामकारकता मोरोपंतांपेक्षा अधिक आहे, आणि सामुदायिक परिणाम पाहिला तर पंत सरस आहेत.
 नांदापूरकरांनी या सर्व विवेचनात नि:पक्षपाती राहण्यात फार मोठे यश मिळविले आहे हे कबूल करावेच लागते. त्यांनी मुक्तेश्वरांची कथानकरचना ज्या ज्या ठिकाणी विघडल्याचे सांगितले आहे, त्या त्या ठिकाणी वेचक मोजक्या शब्दांत उणिवांचे वर्णन आहे. तितकेच वेचक गुणवर्णनही आहे. क्वचितप्रसंगी मुक्तेश्वरांची कथानकरचना व्यासानांही वरचढ असते, त्या ठिकाणी मोकळ्या मनाने त्यांनी मुक्तेश्वरांची स्तुती केली आहे. आदिपर्वात दुर्योधनाने भीमाला विषान्न चारल्याचा प्रसंग आहे. मूळ महाभारतात विषान्न आधी चारले जाते, आणि जलक्रीडा नंतर आहे. मुक्तेश्वरांनी जलक्रीडा आधी घेऊन दुर्योधनाने भीमाची क्षुधा उत्तेजित केली व नंतर विषान्न चारले अशी रचना घेतली आहे. ती अर्थातच मुळापेक्षा अधिक आकर्षक आणि नैसर्गिक आहे. या ठिकाणी मुक्तेश्वरांनी व्यासांवर ताण केली आहे. मोरोपंतांसमोर व्यास व मुक्तेश्वर दोघेही होते. पण त्यांना सुरक्षित व्यासानुकरण करणे आवडले. मार्मिक मुक्तेश्वरांचे अनुकरणसुद्धा सुचले नाही तिथे स्वतंत्र प्रतिभेची चमक ते काय दाखवणार ? नांदापूरकरांनी हे सारे त्यांच्या स्पष्ट व नेटक्या शैलीत मांडले आहे. अण्णात पूर्वग्रह नाहीत. त्यांची अभिजात रसिकता गुणग्रहणाला जशी अपुरी पडत नाही तसा त्यांचा न्यायनिष्ठुरपणा कधी कुणाला क्षमा करीत नाही. कर्णाची आणि दुर्योधनाची मैत्री यानंतर अनेक वर्षांनी होते. या प्रसंगी दुर्योधनाने कुणालाही विश्वासात घेतलेले नाही, पण मुक्तेश्वरांनी नित्याप्रमाणे भीमाला विषान्न चारण्याचे कारस्थान चांडाळचौकडीचे म्हणून दाखविलेले आहे. नांदापूरकरांनी त्याबद्दल स्पष्टपणे नापसंती व्यक्त केली आहे. मोरोपंतांच्या विषयी त्यांच्या मनात अतीव प्रेम वसत असे. त्यांच्याशी खासगी बोलताना ते नेहमी प्रकट होई. पण प्रबंधात मात्र त्यांनी मोरोपंतांचे परीक्षणसुद्धा तितकेच कठोरपणे केले आहे. द्रोणाचार्यांच्यापासून कृतविद्य झालेले कौरव-पांडव आपले युद्धकौशल्य दाखविण्यासाठी रंगभूमीवर जमले आहेत. त्या ठिकाणच्या रंगभूमीचे, त्यांच्या युद्धकौशल्याचे मुळात आणि मुक्तेश्वरांत मोठे उठावदार वर्णन आहे. पण पंतांनी हा सारा प्रसंग संक्षिप्त घेतला आहे. या ठिकाणचा संक्षेप रसभंगकारक आहे हे सांगण्यास अण्णा कधी विसरत नाहीत. मोरोपंतांचे बारीकसारीक दोषसुद्धा त्यांनी वेचून दाखविले आहेत. कणिकनीतीचा संक्षेप करून जंबूककथा मात्र मुळाप्रमाणे सांगण्यात पंतांनी औचित्यविवेक घालविला आहे, हे त्यांनी स्पष्ट केले