पान:अभिवादन (Abhivadan).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६ । अभिवादन

आहे, रचनेतील प्रमाणबद्धता गमावली गेली आहे, कथानकाचे सौंदर्य उणावले आहे. ही ढवळाढवळ मुक्तेश्वरांत जास्त असल्यामुळे वरील सर्व दोष मुक्तेश्वरांत जास्त आहेत. भारतापेक्षा भिन्न अगर विरोधी कथानकरचना सामान्यतः नऊ कारणांनी झाली आहे : १) नीतितत्त्व प्रतिपादनाचा आग्रह, २) मूळ संस्कृत समजून घेण्यातील चूक, ३) आपले स्वातंत्र्य दाखविण्याचा हव्यास, ४) इतर ग्रंथांचा आधार घेण्याची इच्छा, ५) खरोखरी क्षुल्लक नसणाऱ्या पण उभय मराठी कवींना क्षुल्लक भासलेल्या गोष्टींची उपेक्षा, ६) कौरवांचा असत्पक्ष व पांडवांचा सत्पक्ष असे नक्की मत, ७) भक्तिभावाचा विकास दाखवण्याची इच्छा, ८) स्वकालीन समजुतींचा पगडा आणि ९) अनवधान
 नांदापूरकरांनी प्रत्येक ठिकाणी झालेला फेरफार यांपैकी कोणत्या कारणांमुळे झाला आहे हे सविस्तर नोंदवून मोरोपंतांत मूलानुसरण जास्त असल्यामुळे त्यांचे कथानक या सर्व दोषांनी कमीत कमी डागाळलेले आहे असे मत दिले आहे. कथानकात सत्यसृष्टीशी संवाद साधावा लागतो. हा संवाद व्यासांनी अतिशय काळजीपूर्वक साधला आहे असेही मत त्यांनी दिले आहे. त्यांच्या मते सृष्टीची उत्पत्ती आदी कल्पना व्यासांनाही प्राचीनच होत्या. प्रसंग व व्यक्ती दीर्घकाल स्मरणात राहाव्यात म्हणून काही बाबींना दैवी परिवेष देऊन वर्णन करण्याची त्यांची पद्धती आहे. हे सोडले तर व्यासांचे कथानक मानवी, सुसंगत, संभाव्य व सत्यसृष्टीशी संवादी आहे. उभय मराठी कवींनी साध्या, सरळ आणि ऐतिहासिक सत्य कथानकाला अद्भुत, देवी, चमत्कारपूर्ण व असंभाव्य करून टाकले आहे. हा प्रकारसुद्धा मुक्तेश्वरात मोरोपंतांपेक्षा जास्त आहे. तुलनेने पंतांचे कथानक सत्यसृष्टीशी अधिक संवादी आहे. हे कथानक ज्या काळी घडले त्या काळचे वातावरण त्यात प्रतिबिंबित झाले पाहिजे. वातावरण रंगविण्याचे कौशल्य व्यासात जितके आहे त्या मानाने मुक्त-मयूर दोघांतही कमी आहे. दोघांनीही कालविपर्यासाचे दोष करून आपल्या काव्यात स्वकालीनता आणली आहे, पण त्यांतल्या त्यात मोरोपंतांनी पुष्कळचं तोल सावरलेला आहे. मुक्तेश्वरांच्यामध्ये स्वकालीनता इतकी जास्त आहे की, वाचक भारतापेक्षा अगदी वेगळ्या वातावरणात निघून जातो. या दृष्टीने मोरोपंत वरचढ आहेत. प्रदीर्घ कथानकात वर्णनांची विविधता, विपुलता आणि विशालता असावी लागते. त्याने कथानकांत भरीवपणा येतो. महाभारतात तिन्ही बाबी आहेत, क्वचित प्रसंगी कृत्रिमता, ठराविकपणा व प्रमाणातिरेक हे दोष भारतात आहेत. पण ते अल्प आहेत. मुक्तेश्वरांतही या सर्व बाबी आहेत. त्यामुळे त्यांचे कथानक भरीव वाटते पण त्यात अतिरंजितता आहे. मोरोपंतात इतकी विविधता आणि विपुलता नाही. संभाषणचातुर्याच्या बाबतीत उभय मराठी कवी जवळजवळ समान दर्जाचे आहेत. औचित्याच्या दृष्टीने पाहिले तर महाभारतात औचित्यभंग तुरळक