पान:अभिवादन (Abhivadan).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । २१

आढावा घेतला आहे. हा आढावा त्यांची वैयाकरण दृष्टी कशी चौफेर होती है सांगणारा तर आहेच, पण मोरोपंतांच्या भाषिक वैशिष्ट्यांचा आढावा याआधी प्रा. बनहट्टींनी घेतला आहे हे सांगून आपण गप्प बसण्यात त्यांचा प्रामाणिकपणा आणि ज्ञानक्षेत्रातील विनम्र रसज्ञता दाखविणाराही आहे. नांदापूरकरांच्या घरी उभय कवींच्या व्याकरणवैशिष्ट्यांचा विस्तृत आढावा घेणाऱ्या वह्या मी पाहिलेल्या आहेत. त्यांनाही मोरोपंतांच्या भाषिक वैशिष्ट्यांचा आढावा घेता आला असता; पण जे श्रेय बनहट्टींच्याकडे गेले पाहिजे ते जाऊ देण्याची विनयशीलता दाखविणे त्यांना योग्य वाटले.
 ऐतिहासिक दृष्टीने पाहता नांदापूरकरांच्या प्रबंधातील अत्यंत वादग्रस्त आणि लेखकाची प्रतिपाद्य विषयावर खरोखरच पकड होती काय याविषयीसुद्धा संशयित करणारा असा सामाजिक परिस्थितीचा अकरावा उन्मेष आहे. नांदापूरकरांनी महाभारताचे समाजशास्त्रीय विश्लेषण करण्यात पराकाष्ठेचे परिश्रम घेतले आहेत. पण महाभारतासारख्या संकरोद्भव ग्रंथाचे समाजशास्त्रीय परीक्षण करण्यासाठी जी ऐतिहासिक दृष्टी असावी लागते ती त्यांच्याजवळ होतीच असे म्हणता येत नाही. सामाजिक अभ्यासाच्या दृष्टीने जे जे काही त्यांना महत्त्वाचे वाटले त्याविषयी अभ्यासक्षेत्रात असणाऱ्या विभागांतील पुरावा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे संकलित करून ठेवलेला आहे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. पण मुळात ऐतिहासिक दृष्टीचीच उणीव असल्यामुळे असे संकलन पुष्कळदा अनाठायी होऊन जाते, तर पुष्कळदा महत्त्वाचे दुवे संकलित करावयाचे राहून जातात. नांदापूरकरांनी अस्त्रविद्याविषयक एक भाग संकलनाचा म्हणून घेतला आहे. महाभारतकाळी अस्त्रविद्या खरोखरच होती काय, याचा उलगडा भारतभर अस्त्रविद्येचे जे उल्लेख इतस्ततः विखुरले आहेत ते गोळा करून होणार नाही. सर्व पुराणग्रंथांतून आढळणारे स्मरणमात्रेकरून विष्णूच्या हाती येणारे सुदर्शन चक्राचे उल्लेख संकलित केल्यामुळे इ. स. पूर्व ३१०१ च्या सुमारास असे कोणते शस्त्र उपलब्ध होते हे ठरणार नाही. अस्त्रविद्या ही यांत्रिक शस्त्रांची विद्या होती, असे मत असेल तर हे सारे संकलन 'हत्यारे' या सदराखाली जायला पाहिजे व जर अस्त्रे ही मंत्रविद्या होती हे मत मान्य असेल तर 'जादू' या सदराखाली हे संकलन गेले पाहिजे. आणि अस्त्रविद्येचे संकलन कोणत्याही सदराखाली जरी गेले तरी प्राचीन काळी अशी कोणती विद्या अस्तित्वात होती याविषयी कमालीचे संशयित राहिले पाहिजे. पण नांदापूरकर अस्त्रविद्या हे स्वतंत्र सदर करतात आणि खरोखरच त्या काळी अस्त्रविद्या होती असे गृहीत धरून विवेचन करतात. ही महाभारताकडे पाहण्याची कवीची दृष्टी झाली. सामाजिक परिस्थितीचा अभ्यास म्हणजे इतिहासाची दृष्टी. पुढे एके ठिकाणी याच प्रकरणी नांदापूरकरांनी पुरुषांना तात्पुरते