पान:अभिवादन (Abhivadan).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२० । अभिवादन

भाग त्यांनी का गाळला हे मात्र मला माहीत नाही. सौप्तिकपर्व आदिपर्वाच्या आधी रचले गेले इतके एकदा मान्य केले म्हणजे मुक्तेश्वरांनी पाचच पर्वे रचली असावीत अशी खात्री होते. मुक्तेश्वरोत्तर अनेक कवींनी मुक्तेश्वरांनी गाळलेली पर्वेच काव्यासाठी निवडली आहेत, यावरूनही तेच सिद्ध होते. मुक्तेश्वरांनी आपल्या महाभारतात जागजागी आख्याने निबद्ध केली आहेत, पण आख्यानाची रचना त्यांनी आधी स्वतंत्र करून ठेवली होती व नंतर महाभारत रचताना ही आख्याने योग्य त्या स्थळी बसविली गेली अशी भूमिका नांदापूरकरांनी घेतली आहे. पाच पर्वातील सर्वच आख्याने स्वतंत्र रचली होती, असे मानण्याइतका पुरावा त्यांनी दिला नाही. त्यांनी दिलेल्या पुराव्यांवरून काही आख्याने मुक्तेश्वरांनी स्वतंत्र रचली असावीत व नंतर महाभारतात बसविली असावीत इतकेच ठरते.
 यामुळेच 'हरिश्चंद्राख्यान' मुक्तेश्वराने स्वतंत्र रचले असावे हा नांदापूरकरांचा तर्क जरी ग्राह्य मानला तरी त्यामुळे मुक्तेश्वरांनीच ते मूळ महाभारतात बसविले कशावरून नसेल, हा प्रश्न उरतोच. सूर्याने कर्णाची कवचकुंडले हरण करून नेल्याची कथा महाभारतात दोन भिन्न पर्वांत मुक्तेश्वरांनीच दिलेली आहे. हे ध्यानात घेतले तर हरिश्चंद्राख्यान काही ठिकाणी शांतिपर्वांतर्गत का म्हणविले जाते, याचाही उलगडा होऊ शकेल. माझ्या म्हणण्याचा हेतू हरिश्चंद्राख्यान मुक्तेश्वरांच्या संकल्पित वनपर्वात होतेच असे म्हणण्याचा नसून, नव्हतेच हे नांदापूरकरांनी वादातीतरीत्या सिद्ध केले नाही इतकेच सुचविण्याचा आहे.
 के श्री. अजगावकरांनी द्रौपदीवस्त्रहरण प्रसंगीचे जनाबाईचे अभंग म्हणजे मुक्तेश्वरांच्या काव्याचे केवळ वेडेवाकडे शब्दांतर आहे, असे म्हटले होते. नांदापूरकरांनी या प्रश्नाचा सविस्तर विचार करून जनाबाईचा. मुक्तेश्वरांवर झालेला परिणाम स्पष्ट केला आहे. अश्वघोषासारख्या पाखंडी बुद्ध कवीच्या दारावर आमचा कविसम्राट कालिदास उसनवारीसाठी जाईलच कसा, हा प्रश्न मिराशींनी जसा एकदाच साधार आणि बिनतोड सोडविला आहे, तसा नांदापूरकरांनी जनाबाईचा मुक्तेश्वरांवरील परिणाम मोजून दाखविला आहे. 'हरिश्चंद्राख्याना'. तील ढोबळ शंभर स्थळे, ‘थालिपाकाख्याना' तील वेचक पंधरा स्थळे आणि द्रौपदीवस्त्रहरणातील अजून दहा स्थळे अशी सव्वाशे स्थळे तर नांदापूरकरांनी मोजून दाखवली आहेत. आणि ही स्थळे मुक्तेश्वरांनी जनाबाईची कथानक, शैली, शब्द, वाक्प्रयोग, अलंकार, रस आणि संवाद याबाबतींत केलेली उसनवारी आहेत. नांदापूरकरांच्या अतिसूक्ष्म अभ्यासाची ही अजून एक चुणुक आहे. माझ्या मते नांदापूरकरांच्या या लिखाणामुळे जनाबाईचा मुक्तेश्वरांवर परिणाम झाला किंवा नाही हा वाद कायमचा निकालात निघाला आहे.
 नांदापूरकरांनी दहाव्या उन्मेषात मुक्तेश्वरांच्या व्याकरणवैशिष्ट्यांचा विस्तृत