पान:अभिवादन (Abhivadan).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६ । अभिवादन

पुराणपद्धतीचे अनुसरण करणे आणि कलात्मकतेने रसनिष्पत्ती करणे असा दिसतो. मुक्तेश्वरांनी आपला ग्रंथ 'काव्यांरावो' असल्याचा अभिप्राय नोंदविला आहेच. मोरोपंतांची भूमिका प्राधान्याने आत्मोद्धाराची, भक्तिभावना वाढविण्याची, संक्षेपाने भारतकथा सांगण्याची आणि साहित्यनिर्मिती करण्याची आहे. उपरोक्त तीन कवींची भूमिकाच निराळी असल्यामुळे प्रत्येकाचे काव्य स्वतंत्र मानले पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
 अण्णांनी मराठी कवींची काव्ये ही स्वतंत्र काव्य आहेत हे पुराव्यानिशी विस्ताराने सिद्ध केले आहे. मराठीत यापूर्वी कोण्याही कवीच्या संदर्भात त्याच्या स्वातंत्र्याची इतकी साधार, इतकी सर्वांगीण व इतकी परिपूर्ण अशी चर्चा झालेली नाही, हे मान्य करूनही काही प्रश्न शिल्लकच राहतात. त्यांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मराठी कवींच्या स्वतंत्र प्रज्ञेविषयी निःशेष समाधान लाभत नाही. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, कालिदासाने आपले शाकुंतलाचे कथानक महाभारतातून घेतले, पण कालिदास हा कथानक उसने घेणारा वाटत नाही. त्याचे कथानक महाभारतातील आहे यामुळे त्याला काही गौणत्व आले आहे असे कुणी म्हणत नाही. कारण कथानक हा शब्द थोडासा दुहेरी अर्थाचा आहे. कथेचा ढोबळ आराखडा म्हणजेही कथानक आणि विस्तृत आराखडा म्हणजेही कथानक. प्रश्न आहे तो मराठी कवींनी मूळ व्यासकृत कथानकाचा ढोबळ आराखडा स्वीकारला याचा नाही, त्यांनी विस्तृत कथानक मुळातून घेतले याचा आहे. भासाचे 'ऊरुभंग' नाटक अगर कालिदासांचे 'शाकुंतल' वाचताना संविधानकाच्या अभूतपूर्व विकल्पनाचा जो प्रत्यय येतो त्यावर त्यांचे स्वातंत्र्य ठरलेले आहे. मुक्तेश्वर आणि मोरोपंत यांच्या काव्यांत मूळ महाभारतापेक्षा काही ठिकाणी बदल आहेत, वेगळेपणा आहे, हे गृहीत धरूनसुद्धा त्यांनी कुठेही कथानकाचा ढोबळ आराखडा स्वीकारून संविधानकाचे नवविकल्पन केल्याचा प्रत्यय येत नाही. मराठी कवींनी केलेले असे नवविकल्पन जोवर मुक्त-मयूरांत आढळत नाही तोवर त्यांचे स्वातंत्र्य मान्य करणे पुष्कळच कठीण होऊन बसते. मुक्तेश्वरांनी आणि मोरोपंतांनी मूळच्या कथानकात जे बदल केले आहेत त्यांचा हेतू, असलेल्या भारतीय कथानकातून त्यांना प्रतीत झालेली नवी संगती आविष्कृत करणे हा होता, असे जोवर सिद्ध केले जात नाही तोवर मराठी कवींचे स्वातंत्र्य पूर्णपणे सिद्ध होत नाही. नांदापूरकरांनी मूळ महाभारतातील किती श्लोकांचा अनुवाद मुक्त-मयूरात आला आहे याची जशी यादी दिली आहे तशी मूळ महाभारताचे संविधानक मुक्त-मयूरांनी किती ठिकाणी बदलले आहे आणि या बदलामागे त्यांची कोणती संगतीची दृष्टी होती, हेही जर तपासून दाखवले असते तर बरे झाले असते.
 मुक्तेश्वर आणि मोरोपंत दोघेही भक्तीच्या व सदाचाराच्या प्रसंगांचा विस्तार