पान:अभिवादन (Abhivadan).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । १५

यांची उभय रीती वर्णिली आहे. मुक्तेश्वरांनी एकटा शंतनूच कामार्णवात भिजवून काढला आहे. मोरोपंतांनी हा सगळाच प्रसंग संक्षेपून टाकला आहे. त्यांना हा प्रसंग रसनिर्मितीचा वाटलाच नाही. म्हणजे उभय मराठी कवींचा भर देण्यातला स्वतंत्रपणा मान्य करावाच लागतो. एकच कथानक असले तरी प्रत्येकाचा emphasis भिन्न आहे. मुक्त-मयूर दोघांनाही काही गोष्टी प्रतिकूल वाटतात. कधी उभय मराठी कवींनी प्रतिकूल भागाचा संक्षेप केला आहे, तर कधी तो अजिबात गाळला आहे. दुष्यंत-शकुंतलेचे मीलन आयुष्यात एकदाच होते. या घटनेनंतर भरताचा जन्म मूळ महाभारतात ३ वर्षांनी होतो. मुक्तेश्वरांनी आपल्या अधिकारात शकुंतलेच्या पोटी भरत दहा महिने होताच जन्मवून दाखवला आहे. मोरोपंतांनी काळाचा उल्लेख अजिबात टाळला आहे. उभय मराठी कवींनी जसा प्रतिकूल भागाचा संक्षेप केला आहे, तसा अनुकूल भागाचा आपल्या मर्जीप्रमाणे विस्तार केला आहे. या बाबतीत प्रत्येकाने आवडीनिवडीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. लोकप्रसिद्ध आख्याने, उत्सवप्रसंग, भक्तिभाव वाढवणाऱ्या गोष्टी, उपदेश, गुरुस्तुती अशा ठिकाणी मुक्तेश्वर मुळापेक्षा जास्त विस्तार करतात आणि कथानकात संक्षेप करतात. मोरोपंत सदाचाराचे व भक्तीचे प्रसंग पाहून, कौटुंविक जीवनाचे प्रसंग पाहून विस्तार करतात. असा प्रत्येकाचा संक्षेप-विस्ताराचा पवित्रा स्वतंत्र आहे. दोघा मराठी कवींची स्वभावरेखाटणे भिन्न आहेत; आणि दोघांनीही भारतातल्या काही कथा अजिबात गाळल्या आहेत, तशा भारतात नसलेल्या काही कथा नव्या घातल्या आहेत. यासाठी मुक्तेश्वरांनी आपले काव्य सजविण्यासाठी ज्या ग्रंथांचा वापर केला त्याची यादीही नांदापूरकरांनी दिली आहे. भागवत, रामायण, जैमिनी, अश्वमेध, भारतमंजिरी, नागानंद, कथासरित्सागर, सुभाषितरत्नभांडार, पद्मपुराण, स्कंदपुराण, ज्ञानेश्वरी, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, कथाकल्पतरू, विष्णुदास नामाकृत-भारत, जनाबाईची आख्याने, गुरुचरित्र इ. इ. आणि मुक्तेश्वर तर सरळच कधी कधी असे म्हणतात की, " ही कथा सांगावयास बहुधा व्यास विसरले असावेत. मी ती स्वीकृत करून कथा पूर्ण करतो." म्हणजे कथा कुठून उचलावी या बाबतीतही मराठी कवींनी आपले स्वातंत्र्य राखलेच आहे.
 अजून एका पद्धतीने नांदापूरकरांनी उभय मराठी कवींची काव्ये स्वतंत्र असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यांच्या मते महाभारत हा ग्रंथ लिहिण्याचा व्यासांचा उद्देश पुराणपद्धतीला अनुसरून कौरव-पांडवांचा इतिहास सांगणे हा दिसतो. हा इतिहास सांगत असताना इहलोक व परलोक यांत सुख, शांती व समाधान प्राप्त करून देणारा सद्धर्म, सदाचार आणि नीती सांगणे व कृष्णभक्तीचा प्रचार करणे हेही दोन उद्देश त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहेत. मुक्तेश्वरांचा भारतरचनेचा हेतू जनतेच्या उद्धारासाठी भारतकथा सांगणे, भक्तिभावना वाढविणे, ही कथा सांगताना