पान:अभिवादन (Abhivadan).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । ११

पूरला गेले असताना प्रा. बनहट्टी यांनी त्यांच्या कल्पनेचे स्वागत केले व हा तौलनिक अभ्यास एखाद्या पर्वापुरता मर्यादित न करता मुक्तेश्वरांच्या सर्व उपलब्ध पर्वांच्याइतका तुलनेचा विस्तार व्हावा असे त्यांनी सुचविले. पुढे डॉ. पेंडसे यांनी, 'मुक्त-मयूर' दोघांनीही व्यासांचे महाभारत आधारासाठी घेतले असल्यामुळे हा तौलनिक अभ्यास सर्वांगीण करण्याच्या दृष्टीने मूळ महाभारताचाही या तुलनेत समावेश व्हावा असे सुचविले. मूळची अण्णांची कल्पना अलंकार, रस, शैली आणि औचित्य या दृष्टीने तुलना करण्याची होती. पण त्यांना पौर्वात्य आणि पाश्चात्त्य दोन्ही निकष लावावेसे वाटले. म्हणून कथानक व स्वभावरेखन यांचाही समावेश झाला. डॉ. पेंडसे म्हणाले, 'कथानकाचा तौलनिक विचार जर तुम्ही करता तर उपकथानकांचाही का करीत नाही?' आणि विद्यापीठ समिती म्हणाली, 'तिघांच्या सामाजिक परिस्थितीचा विचार या प्रबंधात अवश्य झाला पाहिजे.' मोरोपंत हे केवळ भाषांतये नव्हत हे सिद्ध करण्याचा अण्णांचा हेतू असल्यामुळे तिघांच्याही भूमिकांचा, संक्षेपविस्ताराचा आणि स्वातंत्र्याचा तौलनिक विचार करणे भाग पडले. या लांबत जाणाऱ्या मारुतीच्या शेपटाने प्रबंधाचा विस्तार वाढविला, श्रम वाढविले हे तर खरेच, पण मराठवाडा साहित्य परिषद आपल्या खांद्यावर पेलून धरणारे सर्व महारथी अण्णांचे शिष्य नसते, तर प्रबंधाचा हा अफाट विस्तार अण्णांच्या अभ्यासाला कायमचा गारद करून राहिला असता.
 अण्णांनी काढलेले निष्कर्ष सर्वांना मान्य होतीलच असे नाही. आणि मोठ्या श्रद्धेने या प्रबंधातील सर्व विधाने वेदवाक्ये मानावीत असा आग्रह धरण्यातही काही अर्थ नाही. त्यांचे सर्वच निष्कर्ष ज्याला मान्य होतील असा अभ्यासक सापडणे कठीण आहे. पण ज्या कुणाला यापुढे मुक्त-मयूरांची तुलना करायची असेल त्याला नांदापूरकरांच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोण घेणे कठीण आहे. आजची साहित्यमीमांसा कोणत्याही दोन कवींना ते एकमेकांपेक्षा लहान अगर मोठे ठरविण्यासाठी तराजूत घालणे मान्य करणार नाही. अशा प्रकारचे निर्णायक मूल्यमापन करणे हे साहित्यमीमांसेचे कर्तव्य आहे, हेही कोणी मान्य करणार नाही कलामीमांसेची चर्चा करताना कलाकृतीच्या कुठल्याही व्याख्येत प्रतवारीचा निकष अंतर्भुत असला पाहिजे, असे जेव्हा आम्ही म्हणतो त्या वेळी चांगला कवी आणि वाईट कवी त्या व्याख्येच्या आधारे हुडकता आला पाहिजे इतकेच अभिप्रेत असते. दोन महाकवींची त्यांना एकमेकांपेक्षा श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्यासाठी तुलना करणे तत्त्वत: चूक नसले तरी व्यवहारत: फसवे असते. काव्याचे सर्वमान्य असे निकष ठरवून जर निकषांची परिपूर्ण यादी तयार करता आली तर हे कार्य पुष्कळच सुलभ होईल. वस्तुनिष्ठ कसोटया लावून सर्वमान्य निर्णय देता येणे जरी काव्यक्षेत्रात कठीण असले तरी व्यक्तिनिष्ठ का होईना पण अशी चर्चा करता येईल. आज अडचण नेमकी इथे