पान:अभिवादन (Abhivadan).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्राचार्य अनंत सदाशिव आठवले । १११




 पण धर्मावर श्रद्धा असणाऱ्या मंडळींना भगवंतांचे अमुक एक करणे चूक आहे ही कल्पनाच आवडणारी नाही. थोर पुरुषांच्या वागणुकीविषयी किंवा परमेश्वराच्या वागणुकीविषयी चूक-बरोबर अशी चर्चा करणे हेच श्रद्धाळू मनाला आवडणारे नाही. जीवनाचा व्यवहार हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. या गुंतागुंतीच्या व्यवहारात एका प्रश्नाकडे पाहण्याच्या परस्परभिन्न अशा शेकडो बाजू निर्माण होतात. या शेकडो बाजू एकाच माणसाला एका वेळी पटतील अशा नसतील. पण अशा विविध वाजू निर्माण होणे स्वाभाविक आहे याची जाण आपल्याला असली पाहिजे आणि परस्परभिन्न विचारांना आपण मान्यता दिली पाहिजे. निदान त्या बाजूंचा सहिष्णुतेने विचार केला पाहिजे हेही आपणाला जाणवले पाहिजे. सहिष्णुता या शब्दाचा अर्थ ज्या विरोधकांना आपण आवर घालू शकत नाही आणि संपवू शकत नाही त्यांना नाइलाजाने सहन करणे हा नसतो. सहिष्णुतेचा खरा अर्थ आपल्यापेक्षा भिन्न विचार करणाऱ्या माणसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये ह्याची दक्षता घेणे असा असतो. त्यावरोवरच विरोधकाचे गुण व सामर्थ्य यांच्याविषयी आदर आणि आपुलकी हाही असतो. दुर्गा भागवत यांचे महाभारतविषयक विवेचन अनंतरावांनी आक्षेपार्ह मानले आहे, त्याचे खंडनही केले आहे. पण ते करीत असताना दुर्गाबाईच्या भाषावैभवाचे गुणवर्णनही त्यांनी केले आहे. आणि दुर्गाबाईविषयी केवढाही विरोध असला तरी त्यांचा वैयक्तिक अवमान होईल असा कुठलाही उल्लेख त्यांनी केलेला नाही. प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसा याही नियमाला अपवाद आहे. पण नियम म्हणून सर्व विरोधकांच्याविषयी सहिष्णुता व आदर हेच अनंतरावांचे वैशिष्टय आहे.
 धार्मिक मंडळींच्यामध्ये सहिष्णुतेचे प्रमाण अधिक असायला पाहिजे अशी अपेक्षा असते. परंतु प्रत्यक्षात ती फार कमी आढळून येते अशी वस्तुस्थिती आहे. कारण त्यांचा पिंड मूलतः श्रद्धाळू आणि सहिष्णुता या भूमिकेशी विसंगत असणारा असतो. म्हणूनच सहिष्णुता, औदार्य आणि धर्मश्रद्धा या दोन बाबी एखाद्या व्यक्तिमत्त्वात सुसंगत होऊन आढळू लागल्या म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाविषयी माझ्यासारख्याला आकर्षण वाटू लागते. अनंतराव आठवले ह्यांच्याविषयी मला आकर्षण वाटण्याचे हेही एक कारण आहे.
 या सर्व विवेचनात्रा अर्थ महाभारताविषयी अनंतराव जे लिहितात ते मला पटते अगर मान्य आहे असा नाही. महाभारताच्या संशोधित आवृत्तीविषयी त्यांचे विवेचन सगळे ठिसूळ अशा पायावर आधारलेले आहे, असे मला वाटते. शिरवाडकरांच्या ' कौंतेय ' नाटकाविषयीचे त्यांचे विवेचन असेच चुकीच्या दिशेने भरकटत राहिले आहे, असेही मला वाटते. अशी ही मतभेदाची पुष्कळ स्थळे दाखवता येतील.
 माझी आणि अनंतरावांची विचारपद्धती भिन्न आहे. यामुळे एखाद्या विवे