पान:अभिवादन (Abhivadan).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


११० । अंभिवादन : --- - ..



कुंडलाचे दान झालेले दिसत नाही. त्या ऐवजी वासवी शक्तीच्या मोबदल्यात हा एक विनिमय झालेला आहे असे दिसून येते. मग दाता कर्ण ही कल्पना वाढली कशी? असे प्रश्न उद्भवतच राहतात. अशा प्रश्नांची उत्तरे ऐतिहासिक अभ्यासाच्या आधारे द्यावी लागतात. पण तो अभ्यास बाजूला ठेवला आणि केवळ सांस्कृतिक अभ्यास हाही एक अभ्यास असतो आणि अभ्यास म्हणून समाजात चालू असणाऱ्या अनेक निराधार व लोकप्रिय समजुतींच्या विरुद्ध जात असतो हीही बाब लक्षात घेतली पाहिजे.
 वेदांविषयी आपल्या मनात पूज्यताबुद्धी असावी की नसावी हा निराळा प्रश्न आहे. पण मनात जरी वेदांविषयी पूज्यवुद्धी असली तरी यजुर्वेदातील अश्वमेध प्रकरण वाचीत असताना, सांस्कृतिक अध्ययन करतानासुद्धा काही धक्के बसणारच हेही आपण समजून घ्यायला हवे.
 अनंतरावांसारखा धर्मश्रद्ध माणूससुद्धा महाभारतासारख्या पूज्य ग्रंथाविषयी लिहिताना अशी नोंद करतो की, महाभारतात जागोजाग अशी स्थळे आहेत की जी वाचताना मलाही असे वाटते की, असे जर नसते तर बरे झाले असते, आदरणीय व्यक्ती असे वागल्या बोलल्या नसत्या तर बरे झाले असते. कित्येकदा दुर्जनांविषयी मनात कौतुकाची भावना निर्माण होते हे घडले नसते तर बरे झाले असते. असल्या प्रकारचीही काही उदाहरणे त्यांनी नोंदवली आहेत. श्रीकृष्णाने कर्णाला पांडवांच्या बाजूस आणण्यासाठी जी अनेक प्रलोभने दाखवली त्यांत द्रौपदीचेही प्रलोभन दाखवले, असे अनंतरावांना वाटते. कृष्णाने हे केले नसते तर बरे झाले असते, असे अनंतरावांना वाटते. अनंतरावांमधील नीतिपूजक माणूस हे बोलतो आहे हे आपल्या लक्षात येते. एखाद्याला युद्धात आपल्या बाजूला आणण्यासाठी बाईचा मोह दाखवणे हे काही योग्य नाही, असे त्यांना वाटते. द्रौपदीवस्त्रहरणात ज्याचा पुढाकार होता आणि शत्रुत्व करण्यात ज्याचा पुढाकार होता अशा कर्णाला दुर्योधनापासून फोडण्यासाठी आपल्या विश्वासू भक्त मंडळींपैकी अब्रूला जपणारी एक वाई देऊ करणे असे हे भगवंताचे कृत्य काही फार सज्जनपणाचे म्हणता येणार नाही. अनंतरावांनी अत्यंत सौम्यपणे हे सुचवले आहे. माझ्यासारखा नास्तिक असे म्हणेल की, राजकारणात एखाद्या वाईचा वस्तूप्रमाणे वापर करणे ही बाब कितीही आक्षेपार्ह असली तरी जुनी परंपरा आहे. दुसरा कोणी म्हणेल की, पुराणातल्या कहाण्या विविध देवदेवतांच्या लवाइयांनी गच्च भरलेल्या आहेत. देवांनी लबाडी करायची नाही असे ठरविले असते तर त्यांचे विजयच झाले नसते. या जगात लबाडांचे विजय व्हावेत हा दुःखद नियम देवांनी सुरू केलेला दिसतो. अजून कोणी असेही म्हणतील की, दुष्ट प्रवृत्तींच्या माणसांचा पाडाव करण्यासाठी सत्प्रवृत्तींच्या माणसांनी लबाडी करणे हे समर्थनीय आहे.