पान:अभिवादन (Abhivadan).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


१०८ । अभिवादन



आणि सोपे करून सांगायचे म्हटले तरी हे प्रकरण जनतेच्या आटोक्यात येत नाही. पण एखादी गोष्ट माझ्यासारख्याला आवडत नाही म्हणून त्यावर कुणी लिखाण करू नये असे मी म्हणणार नाही. माझी तक्रार ब्रह्मसूत्र हा ग्रंथ अद्वैत भक्तिमार्गाला अनुकूल आहे एवढीच नसून अद्वैती भक्तिमार्ग हेच त्याचे प्रतिपाद्य आहे हा मुद्दा मांडणारे भाष्य अनंतराव लिहू शकले असते, पण त्यांनी ते लिहिले नाही, ही आहे त्या मानाने 'महाभारताचे वास्तवदर्शन' हा ग्रंथ माझ्यासारख्याला अधिक जवळ आहे.
 धार्मिकांच्या गटातसुद्धा धर्मवाङमयाचा नीटसा अभ्यास न करता लिहिण्याची प्रथा पुष्कळ आहे. अनंतराव महाभारताविषयी जे लिहितात ते सगळेच आम्हाला पटते असे नाही. पण ह्या लिहिण्याच्या पाठीमागे असणारा अभ्यास, मतविवेचनाची शिस्त आणि पद्धत ही मात्र मला आकर्षक वाटते. महाभारतावरील लिखाणात. अनंतरावांचा मुख्य भर कर्ण या व्यक्तिरेखेवर आहे. कारण जो उठतो तो कर्णाचा गौरव आणि पुरस्कार करतो. कारणे असताना अगर नसताना, पुरावा असताना अगर नसताना कर्णाचा विषय अनेक आधुनिक लेखकांनी आपल्या लेखपीचा विषय केला. त्यांचा प्रतिवाद करण्याच्या निमित्ताने आणि आनंद साधले, इरावती कर्वे, दुर्गा भागवत इत्यादी अभ्यासकांचा प्रतिवाद करण्याच्या निमित्ताने अनंतरावांनी महाभारतावरील हे लिखाण केले.
 कर्णाच्या बाबतीत मुख्य घोटाळा दोन कारणांमुळे होतो. एक तर लोकसमज असा आहे की, कर्ण हा महापराक्रमी, दानशूर, चारित्र्यवान पण दुर्दैवी असा माणूस आहे. दुसरा समज असा की, कर्ण हा सूतपुत्र म्हणून ओळखला गेला. त्यामुळे त्याला कनिष्ठ जातीय जीवन जगावे लागले. खरे म्हणजे कर्णाच्या पराक्रमाच्या व दातृत्वाच्या कहाण्या परंपरावाद्यांनीच लोकप्रिय केल्या आहेत. धर्मपरंपरा डोक्यावर उचलून धरणाऱ्या मंडळींनी नेहमीच अशी भूमिका घेतली आहे की जय पांडवांचा झाला याचे कारण पांडवांचे बुद्धिसामर्थ्य नव्हे किंवा त्यांचे चारित्र्य नव्हे; त्यांची शक्ती नव्हे किंवा त्यांचे कर्तृत्व नव्हे. पांडवांचा जय होतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बाजूचे आहेत. एरवी पांडवांचा जय झालाच नसता. कृष्ण होता म्हणून अर्जुन कर्णाला मारू शकला नाहीतर कर्णाला मारणे हे कोणाच्या आटोक्यातले काम नव्हतेच. कर्ण एवढा देखणा होता की, द्रौपदीचेसुद्धा त्याच्यावर एकदा मन गेले होते. त्याच्या दानधर्माला तर सीमाच नव्हती. हा सगळा कर्णाचा डोलारा आधुनिकांनी उभारलेला नाही, तर तो परंपरावाद्यांनीच निर्माण केलेला आहे. अनंतरावांनी परंपरेचा हा सगळा खुळेपणा जमीनदोस्त केला हेच चांगले.
 परंपरावाद्यांनी उभा केलेला कर्ण सूतपुत्र म्हणून आधुनिक लेखकांनी पुरोगामी समाजकारणाचा एक पुरस्कर्ता नायक म्हणून उभा केला आहे. त्याचे कारण