पान:अभिवादन (Abhivadan).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


१०२ । अभिवादन



विसंवादी पातळ्या, त्यांचे परस्परांच्यावरील परिणाम, त्यांचे वाङमयावरील परिणाम तपासून पाहण्यासाठी भाऊसाहेबांचे हे लिखाण अतिशय उपयोगी ठरेल.
 या पिढीत, एक तर, समाजसुधारणांच्या निमित्ताने समाजाच्याविषयीची प्रतिबद्धता आणि समाजाला मार्गदर्शन करण्याची जिद्द व हौस, हा थर आहे. या पातळीचा मोह हे लेखक टाळू शकत नाहीत. दुसरे म्हणजे वाङमय आनंदासाठी आहे, आनंद चमत्कृतीतून येतो, ही चमत्कृती घटनांची,- यासाठी कथानकातील गुंतागुंत व अनपेक्षितता. ही चमत्कृती कल्पनांची,- यासाठी कोटया व अलंकार. असा हा चमत्कृतिजन्य आनंदाचा व स्वप्नरंजनाचा भाग या मंडळीच्या मनाचा एक थर आहे. त्याचेही आकर्षण त्यांना टाळता येत नाही. भारताच्या परंपरेविषयीचा अभिमान हाही तिथे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे महत्त्व कळल्यामुळे त्याचेही आकर्षण आहे. दोन्ही परंपरांचा सोयिस्कर समन्वय लावण्याच्या धडपडीतून निर्माण होणारे विसंवादही आहेत. समकालीन जीवनात विद्वान, चारित्र्यवान, समाजसुधारक म्हणून प्रतिष्ठा मिळवणे व वेगवेगळ्या थरांत रसिक म्हणून लोकप्रियता मिळवणे, असेही थर तिथे आहेत. अशा सर्व चमत्कारिक विसंवादांनी ही मने भारली गेलेली आहेत. त्याचे दर्शन केळकर, कोल्हटकर आणि खाडिलकर या त्रयीत, मागे हरिभाऊ, केशवसुतात आणि पुढे वामन मल्हार- केतकरात दिसून येते. कोल्हटकरांना मध्यवर्ती गृहीत धरून, या वाङमयविश्वाचा चरित्रात्मक टीकापद्धतीने नव्याने अभ्यास करता येईल, असे वाटते. अशा अभ्यासाची जिज्ञासा माडखोलकरांनी निर्माण केली. तो अभ्यास शक्य व्हावा यासाठी विपुल चरित्रात्मक तपशील दिला. आणि या अभ्यासामुळे त्या वाङमयाचे स्वरूप नव्याने लक्षात येण्याची सोय उपलब्ध झाली. हे मराठी वाङमयसमीक्षेवर माडखोलकरांचे फार. मोठे ऋण राहणार आहे.
 माडखोलकरांनी जर आपल्या टीकेचा विशिष्ट प्रकारचा प्रपंच मांडला नसता, तर. देवलांच्या 'संशयकल्लोळा' चे पुष्कळसे अंतरंगदर्शन घडलेच नसते. बालकवी, गडकरी यांच्या वाङ्मयातील अनेक चमत्कारिक रहस्यांचा उलगडा करण्याची इच्छाच निर्माण झाली नसती. कोल्हटकर, केळकर यांच्या वाङमयातील अनेक स्थळे अज्ञात राहिली असती. या साऱ्या प्रयत्नात थोर वाङमयीन नायकांचे मूर्तिभंजन होत आहे का ?- मला तसे वाटत नाही. माडखोलकरांच्या या लिखाणामागे प्रेरणेची अशी दूषित दृष्टी नाही. त्यांना कुणाची. विटंबना अगर मूर्तिभंजन करायचे नाही. या वाङमयाने असा आकार का धारण केला, या आकाराच्या मागे सामाजिक आणि चरित्रात्मक कारणे कोणती आहेत, इकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. वाङमयाचे अलौकिक विश्व लौकिक विश्वाशी कसे जोडलेले आहे, यावर प्रकाश टाकण्याची ही धडपड आहे.