पान:अभिवादन (Abhivadan).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । १०१


रमण्याची एक सवय कोल्हटकरांनी मराठी साहित्याला लावली. या स्वप्नरंजनाच्या वातावरणाचे मराठी वाङमयावर परिणाम झाले. हे कोल्हटकरांचे मराठी साहित्यातील युगप्रवर्तक स्थान नाकारताही येणार नाही, पण त्याबरोबरच कोल्हटकरांच्या वाङमयसृष्टीतील मूलभूत दुबळी जागाही विसरता येणार नाही.
 कोल्हटकरांना कथानकाचे स्वतंत्र महत्त्व वाटे. भाषाशैलीचेही स्वतंत्र महत्त्व वाटत होते. कथानकातील गुंतागुंत, या गुंतागुंतीची अनपेक्षित उकल ही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट होती. आलंकारिक भाषाशैली ही दुसरी महत्त्वाची गोष्ट होती. रसोत्कटता, व्यक्तिदर्शन, जीवनदर्शन, वास्तवता या बाबींच्याकडे त्यांचा फारसा कल नव्हता. त्यांनी खलपात्रांनाच विनोदही करायला लावलेले आहे. हे करीत असताना जीवनातील खलत्व ही गंभीर बाब आहे, विनोदाचा खेळकरपणाशी संबंध आहे, खलपात्रच विनोदी होणे यामुळे कृत्रिमता वाढते, खलपात्र विनोदी व्हायचे असेल तर विनोदच बुद्धिवैभवाने आणि उपरोधाने दाहक करावा लागतो, असे कोल्हटकरांना वाटले नाही.
 कोल्हटकरांच्या विनोदाचेही हेच वैशिष्ट्य आहे. केवळ कोट्या इतकेच त्या विनोदाचे स्वरूप नाही. तो विनोद निबंधवजा लेखातील विनोद आहे. त्या विनोदातील मर्म समजण्यासाठी हिंदू धर्मातील बारीकसारीक ज्ञान आणि शब्दातील अर्थच्छटांची तीव्र जाणीव वाचकांच्या जवळ असणे आवश्यक आहे. म्हणजे तो विनोद पंडितांचा विनोद आहे. कोल्हटकरांच्या नाटकातील शृंगार पंडितांचा शृंगार आहे. त्यांची समीक्षासुद्धा रसग्रहणावर आधारलेली नाही. चांगल्या कलाकृतीचे समरसून सौंदर्यग्रहण करणे त्यांना कधी जमलेच नाही. माहिती आणि वर्गीकरणाचा तपशील, विश्लेषण आणि पद्धतिविषयक चर्चा हीच त्यांच्या समीक्षेचीही वैशिष्ट्ये राहिली. या वैशिष्ट्यांच्या जोरावर समीक्षाक्षेत्रातील एखाद्या व्यापक सिद्धान्तना पर्यंत पोचणे त्यांना शक्य झाले नाही.
 व्यक्ती म्हणून कोल्हटकर अतिशय रसिक होते, संभाषणचतुर होते. नवोदित साहित्यिकांना मित्राप्रमाणे वागविण्याची, त्यांचे कौतुक करण्याची, त्यांना पुढे आणण्याची त्यांची प्रवृत्ती होती. त्यांच्या जीवनात थोडा लंपटपणा होता, तशी व्यापक रसिकता होती. ते रसिकतेने सौंदर्याचे ग्रहण करीत, गंभीरपणे शास्त्रचर्चाही करीत. त्यांची शारीरिक वैगुण्ये त्यांना जन्मभर सोबत करीत राहिली.. पण त्यांचे व्यक्तित्व स्त्रियांच्यासाठी रुबाबदार आणि आकर्षक राहिले. या साऱ्यांचा मोठ्या जिव्हाळ्याने माडखोलकरांनी विचार केला आहे. त्या वेळचे वाङ्मयविश्व समजावून घेताना, जीवन व वाङमयाचे सांधे जोडताना, चरित्रात्मक टीका समृद्ध करताना, माडखोलकरांनी दिलेली ही सर्वच माहिती अतिशय महत्त्वाची ठरेल. वाङमयातील त्या काळची पिढी अनेक विसंवादी थरांनी भरलेली होती. त्या