प्रस्तावना
मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to basic technology [IBT]) या कार्यक्रमातील सहभागी शाळांची संख्या वाढत असताना कार्यक्रमाची गुणवत्ता टिकवून ठेवणे हे आव्हानच आहे. त्यासाठी निदेशकांचे प्रशिक्षण, मासिक शाळा भेटी, समन्वयक प्रशिक्षण विज्ञान आश्रम नियमितपणे आयोजित करत असतोच, परंतु शाळेत IBT दिवसांचे नियोजन कसे करावे? पूर्वतयारी काय करावी? उपलब्ध सैद्धांतिक माहिती कुठे उपलब्ध होईल आदी अनेक अडचणी निदेशकांकडून मांडल्या जात होत्या. एस.एस.सी. बोर्डाने केलेली शिक्षक हस्तपुस्तिका IBT चे शाळास्तरावरील नियोजनास अपुरी पडत असल्याचे जाणवत होते. त्यावर बरेच विचार मंथन झाले व IBT चे दिवसानुसार नियोजन निदेशकांना करून देण्याचे ठरले. त्याप्रमाणे ही पुस्तिका तयार होत आहे. IBT विषयातील प्रत्येक विभागाला महिन्यातून आठ दिवस मिळतात व ते आठ दिवस योग्य रीतीने वापरले जाणे हे आवश्यक आहे. सदर पुस्तिकेत IBT दिवस कसा असावा व त्यामधून विद्यार्थ्यांनी काय करावे, त्यांच्याकडून प्रात्यक्षिके व कोणत्या लोकोपयोगी सेवा करून घ्याव्यात हे दिले आहे. स्थानिक गरजेनुसार दिवसांचे नियोजन पुढे-मागे करता येईल. मात्र सर्व कृती होणे आवश्यक आहे. IBT अभ्यासक्रम हा हाताने काम करत शिकणे' - स्वावलंबन या पद्धतीनेच राबवला जायला हवा. त्यासाठी साहित्याची उपलब्धता करून देणे आवश्यक आहेच. IBT दिवसाचा वेळ, साहित्य खरेदी करण्यासाठी वाया जाऊ नये यासाठीचे नियोजन समन्वयक व निदेशकांनी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी काम करताना विविध विषयातील कॉस्टिंग, मार्केटिंगचे ज्ञान मिळविणे अभिप्रेत आहे. त्यामुळे काम करत असताना सैद्धांतिक माहिती व विचारा प्रश्न-शोधा उत्तरे प्रश्नपुस्तिकेतील प्रश्न (FAQ) या संदर्भातील संवाद विद्यार्थ्यांबरोबर व्हायला हवा.
विज्ञान आश्रमातील कार्यकर्त्यांनी संकलित केलेल्या या पुस्तिकेचा आपल्याला उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. IBT उपक्रम १०० शाळांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्लॅन १०० प्रकल्पातील सहयोगी लेंड अहॅड इंडिया, सुझलॉन फाऊंडेशन, आशा फॉर एज्युकेशन, एच.के.एफ. यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार! ही पुस्तिका च्या प्रकल्प साहाय्यातून प्रकाशित करता आली, त्याबद्दल त्यांचे आभार! या पुस्तिकेतील त्रुटी व सूचना यांचे स्वागतच आहे. आपल्या शाळेत IBT उपक्रम राबवून आपण सर्वजण शिक्षणाचे रूप बदलण्यासाठीच्या धडपडीत योगदान करत आहात. आपल्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांना शुभेच्छा!
- डॉ. योगेश कुलकर्णी
संचालक, विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे.