पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



खेळ आणि व्यापार : रोमन विरुद्ध ग्रीक परंपरा


 श्रीनगर येथील 'गुलाम बक्षी स्टेडियम'वर भारतभरच्या राज्याराज्यांतील पोलिसदलांच्या फूटबॉलच्या सामन्यांतील अंतिम टप्प्याचा सामना चालू होता. अलीकडे श्रीनगरमध्ये सामने वगैरेसाठी फारशी गर्दी जमत नाही. घातपाताच्या धोक्याची टांगती तलवार असल्याने तुरळक म्हणण्यापलीकडे गर्दी जमत नाही; पण या स्पर्धांच्या निर्णायक सामन्यालामात्र वीस हजारांवर प्रेक्षक हजर होते. जणू काही, काश्मिरात काही वणवा पेटलेलाच नाही असे फूटबॉलच्या उत्साहाने जमले होते. सामन्यात काश्मीरचा पोलिस संघ आधीच्याच फेरीत बाद झाला होता. म्हणजे आपल्या ओळखीपाळखीच्या खेळाडूंची क्रीडांगणावरील करामत पाहण्यासाठी म्हणून लोकांचा उत्साह उमाळत नव्हता; निर्णायक सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ होते सरहद्द संरक्षक पोलिसदल (BSF) आणि कर्नाटक पोलिस. काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीत सरहद्द संरक्षक पोलिस (BSF) लोकप्रियतेच्या शिखरावर नसावेत हे उघड आहे. पण, त्यांच्यावरचा राग प्रेक्षकांनी ज्या कल्लोळाने त्यांची हुर्रे उडवून केला तो मोठा अद्भूत होता. सरहद्द संरक्षक पोलिस परकीय आक्रमकांचे सैन्य आहे, अशी सर्वसाधारण भावना काश्मीरमध्ये आहे. सामना सुरू होण्याआधीच प्रेक्षकांनी कर्नाटक संघाच्या बाजूने असा काही जयजयकाराचा धोशा लावला, की सरहद्द संरक्षक पोलिस संघाचे मनोधैर्यच खचले असावे. त्यांची पीछेहाटच होऊ लागली तसे प्रेक्षक अधिकाअधिक चेवाने त्यांची हुर्रेवडी करू लागले. 'लोकांना छळता काय? घ्या आता!' अशा अर्थाच्या घोषणा प्रेक्षक देऊ लागले. यात पाकिस्तानधार्जिणेपणा आणि भारतविरोध छपलेला होता असे म्हणणे कठीण आहे. कारण, प्रेक्षक जयजयकार करत होते तो कर्नाटक संघाचा. कर्नाटक नेमका कुठे आहे याची प्रेक्षकांना कितपत खबर होती कोणास ठाऊक? ते जयजयकार करत होते वीरप्पनच्या नावाने! वीरप्पन

अन्वयार्थ – दोन / ९९