पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकारांचा सारा इतिहासच नामर्दपणाचा, कचखाऊपणाचा आहे. एका सम्राट अशोकाने कलिंगाची लढाई पाहिली, त्यातील रक्तपाताने तो इतका उबगला, की एका रात्रीत शांती आणि अहिंसेचा प्रेषित बनून गेला. पृथ्वीराज चौहानने महंमद घोरीला तीन वेळा कैद केले आणि प्रत्येक वेळी त्याची गयावया ऐकून त्याला माफ करून सोडून दिले. याच महंमद घोरीने पृथ्वीराजावर मात करण्याची संधी मिळताच, त्याला कैदी बनवले तेव्हा भूतकाळातील उपकारांचा मुलाहिजा न बाळगता त्याचे हालहाल करून, डोळे काढून त्याला ठार मारले; तेव्हा राजकारणातील पुचाटपणा ही अलीकडची गोष्ट नाही. हा आमचा मोठा पुरातन वारसा आहे! अशा पडखाऊ धोरणाचे उदात्तीकरण मोठेमोठे शब्द वापरून सहजपणे करता येते. कोणी मुत्सद्दीपणाचा आव आणतात, कोणी आपण शांतिअहिंसेचे पुरस्कर्ते असल्याचा टेंभा मिरवतात.
 महात्मा गांधींची ऐतिहासिक कामगिरी अशी, की त्यांनी असल्या दीनदुबळ्या भेकड प्रजेतून स्वातंत्र्याचे जनआंदोलन उभे केले. त्यांच्या आंदोलनाला स्वातंत्र्याचे काही श्रेय जाते, हे निर्विवाद. कोणीही जाणकार योद्धा सेनापती महात्मा गांधींच्या लष्करी डावपेचांचे मनोमन कौतुक केल्याशिवाय राहणार नाही; पण या आंदोलनाचा नेता थोर, अनुयायी भारलेले; मधली फळी मात्र- निव्वळ शब्दांचे बुडबुडे सोडणारी, आंदोलन सुरू झाले म्हणजे निमूट तुरुंगात जाऊन बसणारांची आणि बाहेर आल्यानंतर भाबड्या जनतेच्या जयघोषांनी बहरून जाणारांची निघाली. जीनांसारखा एक खणखणीत व्यवहारी राजकीय प्रतिस्पर्धी भेटताच या पुळचट नेतृत्वाने देशाची फाळणी मान्य केली. पंडित नेहरूंच्या जमान्यात तर व्यवहारीपणा (Pragmatism) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले. "आपला उभय पक्षांचा अभ्यास आपण मध्यममार्ग स्वीकारतो," हे पंडित नेहरूंचे मूलभूत तत्त्वज्ञान होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात तटस्थता आणि चीनपुढे शरणागती, काश्मीर प्रकरणी सार्वमताला मान्यता देऊन घोंगडे भिजत ठेवणे आणि अर्थकारणात 'ना नियोजन, ना मुक्त व्यवस्था' असा तृतीयपंथी मार्ग ही सारी या ऐतिहासिक पुळचटपणाचीच लक्षणं आहेत.

 शेतकरी आंदोलनात या कचखाऊ शासनाचे एक दुसरे रूपही मी पाहिले आहे. रस्त्यावर शांतपणे बसून असलेल्या शेतकरी जमावावर याच शासनाचे शिपाई गोळीबार करतात, एवढेच नव्हे तर पक्की दहशत बसवण्यासाठी आसपासच्या गावांत घुसतात, दरवाजे फोडतात, राहत्या घरावरची कौले-पत्रे काढतात, बायामाणसांना, म्हातायाकोताऱ्यांना अर्वाच्य शिव्या घालीत झोडपून

अन्वयार्थ – दोन / ९७