पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अगदी अलीकडील IAC विमानाचे काठमांडू येथून अपहरण, हिज्बुल वाटाघाटी प्रकरण आणि ९ ऑगस्ट रोजीचे व्यापक हत्याकांड इ. देशीपरदेशी प्रकरणे; सरकारचे दाऊद इब्राहिमला व त्याच्या साथीदारांना पकडून हिंदुस्थान आणण्यातील अपयश, बोफोर्स उभे करण्यात अपयश आणि सध्या चालू असलेले चंदनतस्कर वीरप्पन याचे प्रकरण हे सर्व देशाच्या शासनात सगळा पुळचटपणा असल्याचे सज्जड पुरावे आहेत.
 या विषयावर लोकमताची पाहणी अनेक संस्थांनी केली. सर्वसाधारण जनमतही, भारताचे शासन पुचाट आहे असेच आहे; पण एवढे म्हटल्याने प्रश्न सुटत नाही. 'यथा प्रजा तथा राजा!' देशातील जनता बहाद्दर आणि शासन मात्र पुचाट असे असू शकत नाही. शासन कचखाऊ असेल, तर त्याचा अर्थ 'जनताही पुळचट असली पाहिजे' असा होतो. जनता काही सरकारपेक्षा बहाद्दर नाही हे उघड आहे. काश्मीर प्रश्नावर बोलताना किंवा पाकिस्तानविषयी बोलताना अनेक कडवे हिंदुत्वनिष्ठ 'सगळ्यांना पार साफ करून टाकले पाहिजे' अशा तऱ्हेची वीरश्रीची भाषा वापरतात; पण ती भाषा, साफ करण्याचे जे काही काम असेल ते कोण्या दुसऱ्या घरची पोरे रक्त सांडून करणार आहेत, आपल्याला त्याची काही तोशीस पडणार नाही या खात्रीने वापरली जाते.

 IAC विमान काठमांडूहून पळवले. प्रवाशांच्या नातेवाइकांनी दिल्लीत मोर्चे काढले. पंतप्रधानांच्या निषेधाच्या घोषणा केल्या, "काय वाटेल ते करा; पण आमच्या सगळ्या सग्यासोयऱ्यांना सोडवा" असा त्यांचा आक्रोश होता. "आमच्या लोकांचे प्राण गेले तरी चालेल; पण आतंकवाद्यांचा एकदाचा बंदोबस्त होऊन जाऊ द्या." असा सूर एकाच्याही तोंडातून निघाला नाही. वीरप्पनप्रकरणीसुद्धा "कायद्याची शान राखण्याकरिता चित्रपटातील एका अभिनयपटूचा प्राण गेला तरी हरकत नाही." असे कोणी म्हणत नाही. दीडशेवर खून केलेला वीरप्पन आदेश देतो आणि तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री शंभरावर आतंकवाद्यांवरील सारे खटले काढून घेऊन मोकळे करतात आणि लोकांची तक्रार आहे, ती फिल्मी नायकाची मुक्तता होण्यात वेळ लागत आहे त्याबद्दल!
 भा.ज.पा. शासनाची भाषा वीरश्रीची व धोरणे कचखाऊ आणि यापूर्वीची सरकारे काही फार कणखर होती असे नाही. शेवटचा लोहपुरुष होऊन गेला तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची काश्मीरतिबेट यासंबंधीची धोरणे कचखाऊपणाचे नमुनेच होते. खरे म्हटले तर, भारतीय

अन्वयार्थ – दोन / ९६