पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाईल या चिंतेने ते पोरगेही जन्मभर इमानाने नोकरी करी आणि पेन्शनीत निघायच्या आधी आपल्या पोरांनाही, जमले तर, पोस्टात चिकटवून देऊन पैलतीरी जाण्याच्या तयारीला लागे. पोस्टातील या पिढीजात परंपरेविषयी पु. ल. देशपांडे यांनी अगदी अलीकडेपर्यंत लिहिले आणि लोकांना हसवले.
 खरे पाहिले तर, पोस्टात इमानेइतबारे नोकरी करून आयुष्य कंठणारा असामी पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे स्वातंत्र्य आले त्या सुमारास संपला. स्वातंत्र्य आले, समाजवादाच्या आणि हक्काच्या गोष्टी सुरू झाल्या. पोस्टातील नोकराच्या मुलाला पोस्टाच्या नोकरीतच लावून घेणे म्हणजे 'वशिलेबाजी' आहे, सर्वसामान्य माणसांना त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता दुरावते असे म्हणून ही पिढीजात वशिलेबाजीची परंपरा संपवण्याचे ठरले. पोस्टातील प्रत्येक रिकामी जागा रोजगार विनिमय केंद्राला कळवण्यात आली पाहिजे, केंद्राने पाठविलेल्या उमेदवारांपैकीच एकाची निवड झाली पाहिजे असे नियम आले. विनिमय केंद्राने पाठवलेल्या उमेदवाराखेरीज इतर कुणाची भरती केली तर भरती करणाऱ्या अधिकाऱ्याच्या नोकरीवर तत्काळ गंडांतर येईल अशी परिस्थिती तयार झाली. पिढीजात परंपरेच्या आधाराने चाललेली टपालसेवा या रिक्रूटभरतीनंतर एकदम कोसळली. टपाल खात्यात महत्त्वाची पत्रे, मौल्यवान वस्तू यांची देवघेव फारसे कागदपत्र न करता, केवळ विश्वासाच्या भरवशाने होत असते. असल्या कामामध्ये बाजारभरती नोकर आले आणि चोऱ्या व फसवेगिरीला एकदम ऊत आला. टपालाच्या पेटीत पत्र टाकले म्हणजे ते पत्त्यावर पोहोचणारच आणि लवकरात लवकर पोहोचणार हा विश्वास भुर्रकन उडून गेला. 'पत्र २० वर्षांनी पोचले', 'लग्नाची पत्रिका मुलाच्या बारशाला मिळाली' असल्या सुरस कथा वारंवार बातमीपत्रात छापून येऊ लागल्या. कोणी टपाल्या बटवडा करायची पत्रे कचऱ्यात फेकून मोकळा झाल्याच्या कथाही वारंवार ऐकू येऊ लागल्या. पोस्टातले पैसे, म्हणजे पोस्टाच्या बचत खात्यात ठेवलेली रक्कम अमेरिकेतील इदूव्हर्दे मध्ये ठेवलेल्या सोन्यापेक्षाही सुरक्षित, हा विश्वास झपाटयाने कोलमडू लागला. टपाल खात्याची कार्यक्षमतेची परंपरा, वंशपरंपरेने भरती करण्याची 'मध्यमयुगीन' पद्धत संपून, आधुनिक पद्धतीची 'मानवी हक्कावर' आधारलेली भरती सुरू झाली तेव्हापासून संपली.

 सरकारी नोकरभरती अधिकाधिक मानवी होऊ लागली. भरती करायचा उमेदवार केवळ विनिमय केंद्रातून आलेला असला पाहिजे, एवढेच नव्हे तर, भरायच्या प्रत्येक जागेसाठी निवडायचा उमेदवार कोणत्या जातीचा असला

अन्वयार्थ - दोन / ९२