पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






मानवीय न्याय आणि सामान्य माणूस


 सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'वर लट्टू नाही, खूश नाही असा माणूस विरळा. प्रत्येक व्यंगचित्रात, सर्वसामान्यांना हरघडी वाटणारी भावना इतक्या चटकदार पद्धतीने व्यक्त करणाऱ्या या पात्राचा जनक खरोखरच महान प्रतिभाशाली असला पाहिजे. दररोज 'टाईम्स'चा अंक हातात घेतला आणि पहिल्याच पानावर You said it! (कसं बोललात!) चित्र पाहिले की, इतकी प्रतिभाशाली पण सहज-कल्पना आपल्याला का सुचली नाही याच्या रागाने स्वत:च्याच तोंडात फटाफट थोबाडीत मारून घ्यावेसे वाटू लागते.
 पु. ल. देशपांडे यांच्या 'असा मी असामी'चा नायक हा त्याच प्रकारचा सामान्य माणूस. त्याचे विचार आणि भावना आपल्याशी नेमक्या जुळतात असे हरएक वाचकाला आणि श्रोत्याला वाटत राहते आणि म्हणून खळखळून हसून तो दाद देतो. खरे म्हटले तर 'असा मी असामी'चा नायक बेंबटया हे काही शंभरातील नव्वद घरी आढळणारे पात्र नाही, कोकणातील पोस्टमास्तरच्या घरी जन्मलेला हा सामान्य बुद्धीचा पोरगा. त्याचे चित्रण पु. ल. देशपांडे यांनी अनेकवेळा केले आहे. पेन्शनीत निघेपर्यन्त इमानेइतबारे पोस्ट ऑफिसात नोकरी करायची, सारा जन्म पत्रे, बंग्या आणि डिंक यांच्या संगतीत काढायचा; वाईट वर्तणुकीचा, खोटेपणाचा डाग जरादेखील लागून घ्यायचा नाही आणि पेन्शनीत निघता निघता पोरांच्या लेंढारातील एकालातरी पोस्टात चिकटवून द्यायचे म्हणजे साऱ्या जन्माचे सार्थक झाले अशी भावना बाळगणाऱ्या कित्येक पिढ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर सर्व देशाने पाहिल्या आहेत.

 पोस्टात चिकटलेले पोरसुद्धा वंशपरंपरेने सिंहासन मिळावे अशा अभिमानाने काम करी. हिशेबात एक पैसा किंवा पैशाचे एक तिकीट कमी पडले तर प्रश्न केवळ तूट भरून देण्याचा नाही. पोस्टातील पिढ्यान्पिढ्यांचे इमान डागाळले

अन्वयार्थ - दोन / ९१