पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गेल्याच आठवड्यात फिजीतील भारतीय आणि भारतातील फिजीयन (लोकमत १२-०८-२०००) या लेखात लिहिले आहे. वीरप्पनशी बोलणी करायला गेलेले पत्रकार परत आले. त्यांनी, वीरप्पनने चार नवीन अटी घातल्याचा संदेश आणला आहे. कोणा बलात्कारितेला व्यापक नुकसानभरपाई आणि तुरुंगातील पाचसहा टाडा-कैद्यांची सुटका या मागण्या करून वीरप्पन, आपण कोणी महात्मा आहोत अशी छबी तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत, एवढेच दाखवितो. त्याची धक्का देणारी नवी मागणी अशी, की कर्नाटक आणि तामीळनाडू या दोन राज्यांतील कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे सोपविण्यात यावा. या मागणीने दोन्ही राज्यांची सरकारे चक्रावली आहेत. हा प्रश्न हेग न्यायालयाकडे नेणे शक्य नाही; ते का शक्य नाही हे, बोलणी करण्यासाठी पाठविलेले पत्रकार गोपाल स्पष्ट करतील एवढेच त्यांनी म्हटले आहे. त्याबरोबर, सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी वीरप्पन याने १९ ऑगस्ट ही अखेरची मुदत जाहीर केली आहे. थोडक्यात, पूर्वीच्या सगळ्या मागण्या- कैद्यांची सुटका, पन्नास कोटी रुपयांची खंडणी.शेतीमालाचे भाव, शेतमजुरांची मजुरी, दहावीपर्यन्त तामीळमधून शिक्षण इत्यादी इत्यादी, यांखेरीज कावेरी पाण्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्याचे शासनाने कबूल केले नाही तर राजकुमार आणि त्यांच्या परिवारातील मंडळी यांच्या जीविताची काही शाश्वती सांगता येत नाही.
 वीरप्पन हा काही फुसक्या धमक्या देणारा तृतीय श्रेणीचा गुंड नाही. पूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या एका गटाचे, त्यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचाही समावेश होता, त्याने अपहरण केले होते. त्या वेळच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तेव्हा त्याने अधिकाऱ्याच्या पत्नीला फक्त सोडून दिले आणि बाकीच्या सर्व ओलिसांना निघृणपणे ठार केले. राजकुमार आणि त्यांच्या परिवारातील मंडळी प्रसिद्ध पुरुष आहेत; त्यांची कत्तल करण्याची वीरप्पनची हिंमत होणार नाही असल्या अजागळ कल्पनांत ज्यांना राहायचे असेल त्यांनी राहावे; व्यवहारी नेतृत्व असला धोका घेणार नाही. वीरप्पनचे तामीळ वाघांशी संबंध आहेत; स्वतः प्रभाकरन असली कचदिली दाखवीत नाही, वीरप्पनही नाही हे नजरेआड करून चालणार नाही. राजकुमार आणि परिवाराच्या जीवाला कोणताही अपाय झाला तर दक्षिणेत राजकीय भूकंप होईल आणि त्यातून तामिळी वाघांच्या राजकारणास पोषक परिस्थिती तयार होईल.
 धमकी जबरदस्त आहे आणि हा लेख प्रकाशित होईपर्यन्त निर्णयाची मुदत

अन्वयार्थ – दोन / ८७