पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आढावा घेऊन त्याविषयीची टिप्पणी या पुस्तकात फार व्यापकपणे करण्यात आली आहे. 'जनसंसद' झाल्यामुळे, कदाचित, तेथे १९७८ मध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलन यासंबंधाने चालू झालेले विचारमंथन एका तऱ्हेने संपूर्ण साकार आणि सूत्रबद्ध झाले. एक 'पॅराडाईम' तयार झाला.
 हा 'पॅराडाईम' झाल्याचा परिणाम म्हणून की काय कोणास ठाऊक, त्यानंतर मला १९९८ सालाच्या शेवटास लागोपाठ दोन वेळा 'सेरेब्रल स्ट्रोक' आले. पहिल्या स्ट्रोककडे मी गंभीरपणे लक्ष दिले नाही. दुसऱ्या स्ट्रोकच्या वेळी दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. त्यामुळे, एकापाठोपाठ एक मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि या आजारपणाच्या काळात जो काही मोकळा वेळ मिळाला किंवा ज्या काळामध्ये मला प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणे शक्य नव्हते त्या काळात मला 'दैनिक लोकमत'करिता देशातील शेतीक्षेत्र सोडून इतर क्षेत्रांमधील वेगवेगळ्या घटनांचा अर्थ लावणारी लेखमाला लिहिण्याची पुन्हा एकदा विनंती करण्यात आली. ती मी आनंदाने मान्य केली. प्रस्तुतच्या संग्रहात लिहिलेले लेख हे त्या काळच्या, म्हणजे सन १९९८ ते २००० या काळात देशामध्ये विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांविषयी मी केलेली टीकाटिप्पणी आहे.
 शेतकरी संघटनेची म्हणून जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेच्या प्रकाशामध्ये अर्थ लावण्याचे लिखाण मी पूर्वी केले नव्हते असे नाही. 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकात शेतकरी संघटनेचा विचार प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने मांडण्यात आला आहे. त्यानंतर, 'प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश' असे दोन खंडांत एक पुस्तक तयार झाले. त्याखेरीज, 'शेतकरी कामगार पक्ष : एक अवलोकन', 'जातीयवादाचा भस्मासुर', 'शेतकऱ्यांचा राजा शिवाजी' असे इतर अनेक विषयांवरचे लिखाण मी केले होते; परंतु प्रचलित परिस्थितीवर मराठी नियतकालिकामध्ये सलगपणे लिहिण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. (याच्या आधी सन १९९३-१९९४ मध्ये याच दैनिकासाठी लिहिलेले अशाच प्रकारचे लेख 'अन्वयार्थ-१' या लेखसंग्रहात समाविष्ट केले आहेत.)

 प्रस्तुत संग्रहातील लेख प्रचलित घटनांचा अन्वयार्थ लावण्याकरिता लिहिले गेले असले, तरी त्यांचे स्वरूप हे उघड उघड लघुनिबंधांचेच आहे. आज २०१० मध्ये, देशातील परिस्थिती लक्षात घेतली तर कोणत्या परिस्थितीत कोणता लेख लिहिला गेला त्यासंबंधी काही सूतोवाच करण्याची काही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. आजही हे लेख वाचले तर ते लघुनिबंधाप्रमाणे वाचता येतात आणि त्यातील मर्म चांगले समजून घेता येते.

आठ