पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती नद्यांमुळे नाही, कालव्यांमुळे नाही; निम्म्यावर ओलीत जमीन शेतकऱ्यांनी जमिनीच्या पोटातून वर काढलेल्या पाण्यामुळे हिरवी झाली आहे. सरकारी धरणे, कालवे हे अति खर्चीक काम आहे. धरणाच्या पाण्याखाली जमीन भिजवायची म्हटली म्हणजे एकरी खर्च मोठा प्रचंड. त्या मानाने शेतकऱ्यांच्या उपसा योजनांचा खर्च किरकोळ, त्यामुळे दर एकरी गुंतवणूक खूपच कमी.
 कालव्याचे पाणी शेतात वाहू लागले, की पुन्हा केव्हा पाणी येईल कोणास ठावूक, अशा भावनेने पिकांना आडमाप पाणी दिले जाते, पुष्कळ वाया जाते. उपशाच्या पाण्याबाबत असे सहसा होत नाही. आपल्या विहिरीतील पाणी शेतकरी हिशेबाने, काटकसरीने वापरतो. अर्थात, धरणकालव्यांच्या सिंचनापेक्षा शेतकऱ्यांचे उपशाचे सिंचन कमी खर्चाचे, पाण्याचा हिशेबी वापर करणारे म्हणून अधिक श्रेयस्कर. धरणाचे पाणी कालव्याने मिळाले तर जमिनी खारवतात, कायमच्या बर्बाद होतात. असा उपद्रव उपशाच्या पाण्याचा नाही. हळूहळू वाहत शेतात जाणारे पाणी पुन्हा जमिनीत झिरपत जाते आणि पुन्हा खालच्या प्रदेशातील जमिनीच्या पोटातील साठ्यात जाऊन पडते. जमिनीच्या पोटातील वरच्या भागातील पाणी शेतकरी उपसतो, वापरतो आणि त्यातील नव्वद टक्के पाणी पुन्हा खालच्या भागातील भूगर्भात सोडून देतो.
 जगभर उपसा सिंचनाचे श्रेष्ठत्व मान्य झाले आहे. उपशाच्या पाण्यासाठी शेतकरी स्वतः कष्ट करतो, स्वतःचे पैसे गुंतवतो. खोदण्याचे कष्ट केल्यानंतर पाणी लागेलच अशी काही शाश्वती नसते. कधीकधी सारे प्रयत्न विफल होऊन खणलेल्या खड्डयात डोळ्याची टिपे गाळण्याची वेळ येते. पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याचा खजिना मिळविण्याचा हा जुगार शेतकरी जिवाच्या शर्थीने खेळतात.

 याउलट, धरणांचे सिंचन महागडे, लाखोंना विस्थापित करणारे आणि जमिनीची बर्बादी करणारे; पण ते पुढाऱ्यांच्या मोठ्या सोयीचे असते. एखाद्या भागात कालव्याचे पाणी आणले, की मग तो मतदारसंघ पक्का झाला असे समजायला हरकत नाही. कालव्याच्या पाण्याबरोबर ऊस आला, कारखाने आले म्हणजे मग राजकारणाचा खेळ चांगलाच रंगतो. साहजिकच, पुढाऱ्यांना विहिरीच्या उपसा पाण्याचा मोठा दुस्वास वाटतो. जगातील इतर देशांत उलटी विचारधारा चालू आहे. कालव्याचे पाणी शेतात सोडूच नये, कालव्यांची वेटोळी होईल तितक्या विस्तृत प्रदेशात फिरवावी, अशा तऱ्हेने पाण्याचा झिरपा वाढवून भूगर्भातील पाणी वाढवावे, उपशाचे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात अधिक पाणी टाकावे, त्या पाण्याचा वापर अधिक टाकटुकीने होत असल्याने साऱ्या देशाचा

अन्वयार्थ - दोन / ७३