पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पडतो. असे हे चक्र चालू असते. डोंगरांतून अवखळपणे उतरणारे पाणी समुद्रात पोहोचेपर्यन्त जमिनीतील विवरांत आणि भुयारांत जाते, जमिनीत झिरपत जाते आणि जमिनीच्या पोटातही त्याची प्रचंड सरोवरे साचत राहतात.
 आपल्या पिकांना पाणी मिळावे असे स्वप्न सतत पाहणारा शेतकरी जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा मिळेल त्या साधनाने जमीन खणतो, जमिनीतील पाण्यापर्यन्त पोहोचतो आणि ते पाणी मोट किंवा मोटर लावून वर काढतो. सगळ्या विहिरी काही एका दमात खणून होत नाहीत. एका वर्षात किंवा काही महिन्यांत विहीर खणायची, ती बांधून काढायची हा प्रकार स्वातंत्रयानंतर आला. पूर्वीच्या काळी विहिरीचे काम वर्षानुवर्षे नव्हे पिढ्यान्पिढ्या चाले. शेतीची कामे आटोपली, की घरातील मजुरीची जी काही दोनपाच माणसे, हाती येत ती कुदळी, टिकाव, फावडी, घमेली घेऊन पाण्याच्या शोधात निघत. एखाद्या वर्षी दहाबारा हात व्यासाची विहीर पाचदहा फूट खोल झाली म्हणजे सार्थक झाल्याचा आनंद साऱ्या शेतकरी कुटुंबाला वाटे. एक दिवस पाणी लागले म्हणजे मोठा आनंदोत्सव साजरा होई. पाणी लागावे यासाठी अपार सायास; पण त्याखेरीज नवस, गंडेदोरे, बाबा महाराज या सर्वांचा प्रयोग केला जाई. पाणी विहिरीत साठू लागले, की मोट बांधायची आणि बैलांच्या ताकदीने विहिरीतले पाणी उपसून पाटापाटाने ते पिकांची तहान भागविण्याकरिता न्यायचे. बैलांची मोट, त्यावरील शेतकऱ्याचे गाणे हे शेतकरी संस्कृतीचे शेकडो वर्षे प्रमुख प्रतीक राहिले.

 स्वातंत्र्यानंतर चित्र पालटले. लोकसंख्या वाढत गेली. 'अधिक धान्य पिकवा'ची भाऊगर्दी चालू झाली. विहिरी खणण्याच्या कामाला मदत, सबसिडी सुरू झाली. विहिरी खणण्याकरिता बँकांची कर्जे मिळू लागली. आता घरच्या माणसांच्या घामाने खोदल्या जाणाऱ्या विहिरींचा जमाना मागे पडला. एका वेळी शंभरदोनशे मजूर खोदकाम करीत आहेत, सुरुंग उडविले जात आहेत, दगड फोडण्याकरिता यंत्रे वापरली जात आहेत असे चित्र दिसू लागले. थोड्याच काळात, जमिनीला विवर पाडण्याऐवजी सरळ एक छिद्र पाडून पृथ्वीच्या पोटातील तीनतीनशे फूट खोल पाण्यापर्यन्त पोहोचणे सहज शक्य झाले. पाणी सापडले, की त्याचा उपसा करण्यासाठी आता शंभरशंभर अश्वशक्तीच्या मोटारी वापरल्या जाऊ लागल्या. लोखंडी, सिमेंटच्या किंवा प्लॅस्टिकच्या पाइपांनी पाणी दूरवरच्याही शेतात जाऊन पडू लागले. आता शेतकरी संस्कृतीचे प्रतीक विहीर व तिच्यावरील इंजिन किंवा मोटर हे बनले. हिंदुस्थानात जी काही जमीन ओलिताखाली आहे

अन्वयार्थ - दोन / ७२