Jump to content

पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमले नाही, तर आहे तेवढ्याच जमिनीवर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले आणि माल्थसच्या काळानंतर जगाची लोकसंख्या चौपटीपेक्षाही जास्त वाढली असली तरीसुद्धा लोक आज त्या वेळच्यापेक्षाही अधिक चांगल्या तऱ्हेने आणि विविध प्रकारचे खातपीत आहेत. साहजिकच, तंत्रज्ञानविषयक एक तत्त्वज्ञान शेतकरी संघटनेने तयार केले. जगात 'वाईट तंत्रज्ञान' असे काही असत नाही. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू असते. जेव्हा त्याची चांगली बाजू उजेडात येते तेव्हा त्याचा स्वीकार होतो. काही काळानंतर त्याच गोष्टींचा अतिरेक झाला म्हणजे त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात; परंतु दुष्परिणाम दिसू लागले तरी त्यांना घाबरून मागे वळून जुनाट तंत्रज्ञानाचा किंवा जुनाट शेतीपद्धतींचा आश्रय घेतल्याने हा प्रश्न सुटू शकत नाही. एका तंत्रज्ञानाचे दोष दूर करण्यासाठी काही पुढच्या तंत्रज्ञानाकरिता छलांग मारावी लागते, असे शेतकरी संघटनेने मांडले.
 या सर्व आंदोलनांच्या आणि विचारांच्या उत्क्रांतीच्या प्रवाहात माझ्या हातून उदंड लिहिले गेले, ते प्रामुख्याने आंदोलनाच्या प्रचाराकरिता आणि शेतकऱ्यांनी आंदोलनात उतरण्यास उद्युक्त व्हावे यासाठी त्यांचे प्रशिक्षण करण्याकरिता. शेती सोडून इतर विषयांवर फारसे लिखाण मी केलेले नव्हते.

 १९९७ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने जी काही चर्चा लोकसभेमध्ये किंवा बाहेर झाली, त्यात शेतकरी संघटनेचा प्रमुख 'इंडिया-भारत' सिद्धांत कोठेही मांडला गेला नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या ५० वर्षांची या सिद्धांताच्या संदर्भात मांडणी करणे आवश्यक होते. त्याकरिता अमरावती येथे शेतकरी संघटनेने एक 'जनसंसद' बोलावली आणि त्या 'जनसंसदे'मध्ये तीन दिवस अखंड चर्चासत्र करून 'स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशाची प्रगती झाली नाही, स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांची स्वप्ने साकार झाली नाहीत' याचा अन्वयार्थ काढण्याचा मोठा जबरदस्त प्रयत्न झाला. 'स्वातंत्र्यानंतर देश अधोगतीस गेला; परंतु देशाचे स्वातंत्र्यानंतरचे नेतृत्व उज्ज्वल आणि कर्तबगारच होते' एवढेच नव्हे तर, 'स्वातंत्र्य मिळविण्याकरिता जे आंदोलन झाले त्या आंदोलनाचीही परंपरा अत्यंत उज्ज्वल आणि मोठी ऐतिहासिक होती' अशा तऱ्हेची भोंगळ मांडणी शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर होऊच शकत नव्हती. या निमित्ताने १९९७ मध्ये मी 'स्वातंत्र्य का नासले?' ही पुस्तिका पहिल्यांदा लिहिली. तसा या पुस्तिकेचा संदर्भ शेतीशी आहेच आहे, परंतु त्यापलीकडे जाऊन देशातील इतर वेगवेगळ्या क्षेत्रांतील परिस्थितीचा

सात