पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण दररोज एकच अंडे घालण्याऐवजी कोंबडीने दोन अंडी घालावीत, ती अंडी इकडेतिकडे घालू नयेत, ठराविक वेळी ठराविक जागीच अंडी घालावी असा कायदा सरकारने केला असता; त्यासाठी कोंबडीने दाणे खावे केव्हा, पाणी प्यावे केव्हा, उठावे केव्हा, बसावे केव्हा याचा तपशीलवार दैनंदिन कार्यक्रम आखून दिला असता; तो कार्यक्रम शासकीय हुकुमानुसार पार पाडला जावा याकरिता कोंबडीच्या पायाला दोरी किंवा साखळी बांधून डांबून ठेवले असते किंवा पिंजऱ्यात ठेवले असते. कोंबडी बिचारी, इकडे तिकडे फिरावे, दाणे टिपावे अशा जगण्याला सरावलेली. अशी सरकारी बंधने तिला कशी झेपणार? तिने वैताग येऊन, सोन्याची काय साधी अंडी घालण्याचेही बंद करून टाकले असते. चालू जमान्यातले 'करीम अंडेवाले' सुरी वापरीत नाहीत, सरकारी अधिनियम वापरतात किंवा कायद्याचा बडगा पाठीत घालतात.
 शेतीतील सारे उत्पादन अन्नधान्याचे असो, भाजीपाल्याचे असो की फळफळावळीचे असो त्यासाठी पाणी लागते. एकवेळ जमीन नसली तरी चालेल; पण पाण्याखेरीज जीवन असंभव - प्राणिमात्रांचे तसेच वनस्पतींचे. ज्या भागांत मोठमोठ्या नद्या वाहतात तेथे गाळपेराच्या जमिनीत मानवजातीच्या पहिल्या संस्कृती भरभराटीला आल्या. नद्यांचे पाणी थांबवून, वळवून कालव्याने, पाटाने नेऊन जेथे नद्यांचे पाणी उपलब्ध होत नव्हते तेथे ते माणसाने भगीरथ प्रयत्नाने नेले, शेती वाढवली, उत्पादन वाढवले, वाढत्या लोकसंख्येच्या पोटाला लागणाऱ्या भाकरीची सोय केली.
 नद्या प्राकृतिक नकाशाप्रमाणे वाहतात. कालवा आणि पाट काढल्याने पाणी अधिक विस्तृत प्रदेशात नेता येते हे खरे; पण तरीही पाणी सगळीकडे पोहोचत नाही. प्रचंड व्याप्तीच्या प्रदेशात नद्या, कालवे, पाट यांचे पाणी पोहोचत नाही. अशा प्रदेशातील शेतीला पावसाच्या लहरीवर अवलंबून राहावे लागते.

 लोकसंख्या वाढत गेली, भुकेची गरज वाढली म्हणजे हरीने घातलेल्या खाटल्यावर निचिंत पडून राहणे शक्य होत नाही, तसा माणसाचा स्वभाव नाही. कोठून दूरच्या प्रदेशातून पाणी आणण्याबरोबर जमिनीच्या पोटात प्रवेश करून तेथून पाणी वर काढावे; पाण्याचा स्वभाव खाली खाली जाण्याचा; पण त्याच्या या स्वभावावर मात करून पाण्याला वर काढण्याचा भीमप्रयत्न एक नाही दोन नाही, लक्षावधी शेतकरी शतकानुशतके करीत आलेत, करीत आहेत. पावसाचे पाणी आकाशातून पडते, समुद्राकडे वाहत जाते; सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रसरोवरांचे पाणी वाफ होऊन वर जाते, ढग बनते आणि पुन्हा पाऊस

अन्वयार्थ – दोन / ७१