पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वित्तमंत्री यशवंत सिन्हा कितीही गरजले तरी कारखानदार व व्यापारी कर्जदारांना जेरबंद करण्याची हिंमत बँका दाखविणार नाहीत हे उघड आहे. वित्तमंत्र्यांच्या नव्या शौर्याचा सारा तडाखा बसणार तो शेतकऱ्यांना. देशात अडीच कोटी शेतकरी कर्जदार आहेत. त्यांच्या एकूण कर्जाची रक्कम ३२,००० कोटी रुपये आहे. यापैकी फक्त ७,०९५ कोटी रुपये भाकड धरता येतील. एकूण भाकडकर्जापैकी शेती कर्जे १५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. शेती कर्जापैकीदेखील बुडीत कर्जाची टक्केवारी तेवढीच कमी आहे. शेतीकर्जापैकी वट्ट बुडीत कर्जे किती? याचा वेगळा हिशोब मांडला तर ही टक्केवारी यापेक्षाही कमी भरेल. असे असले तरी जबरी वसुलीचा तडाखा शेतकऱ्यांनाच बसणार. कारण, वाघसिंहांना कोणी बळी देत नाही, बळी देतात तो शेळीमेंढीचाच. अजापुत्रम् बलिम् दद्यात.
 शेतीकर्जाबद्दल आणखी एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. शेती हा बुडीत धंदा आहे हे आता सर्वमान्य आहे. शासनाने ग्रामीण संरचनेकडे दुर्लक्ष केले आणि बाजारपेठेत हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडले हे आता सरकारी कागदोपत्री सिद्ध झाले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे, की कर्जदार शेतकरी उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम विष पिऊन जीव देत आहेत, किडनीसारखे शरीराचे अवयव विकून बँकांची भर करण्यासाठी धडपडत आहेत. प्रश्न असा की, या सर्वमान्य बुडीत शेतीधंद्याला बँकांनी कर्जे दिलीच कशी? कोणताही शहाणा बँकर उघड्या डोळ्यांनी ठेवीदारांचे पैसे मातीत का लोटेल? शेतकऱ्यांना कर्जे देताना बँकेच्या नोकरवर्गाने पुरेशी अक्कलहुशारी दाखविली किंवा नाही याचा तपास होणे आवश्यक आहे. दिलेला कोटा पुरा करण्यासाठी गरजू शेतकऱ्यांकडून टक्केवारी घेऊन कर्जे दिली गेली असतील, तर अशा प्रकरणी कर्ज मंजूर करणाऱ्या नोकरदारांकडून बँकांनी नुकसानभरपाई करून घेतली पाहिजे.

 पण, सामोपचाराचे सारे मार्ग अजून काही संपलेले नाहीत. सरकारी हस्तक्षेपामुळे वेगवेगळी पिके पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना किती नुकसान सोसावे लागले याची आकडेवारी सरकारी कागदोपत्री सिद्ध आहे. त्या आधाराने कोणत्याही कर्जदार शेतकऱ्याचे किती नुकसान झाले याचा हिशेब काढणे सहज शक्य आहे. सरकारी धोरणापोटी शेतकरी कर्जदाराने सोसलेले नुकसान म्हणजे उघडउघड त्याने ग्राहक, कारखानदार व इतर नागरिक यांना सरकारच्या वतीने पोहोच केलेली सबसिडी आहे. ही रक्कम त्याच्या कर्जखात्यात जमा केल्यानंतर काही देणे बाकी उरलीच तर मग कठोरपणे वसुली करण्याची भाषा वापरण्यात काही अर्थ

अन्वयार्थ – दोन / ६८