पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्यालये म्हणजे नेतागिरी, नाटके, संमेलने, वनभोजने, सहली यांचे नियोजन करणारी यंत्रणा आणि हीरो वा हीरॉईन म्हणून मिरविण्याच्या जागा झाल्या आहेत. या असल्या कार्यक्रमासाठी विद्यालये काढली जातात. सरकारी मान्यता राज्यकर्त्या पक्षाच्या पुठ्यातील मंडळींनाच मिळते. शिक्षकांचे पगार सरकारने ठरविलेले. भरभक्कम पगार देण्यासाठी सरकारी अनुदाने. शिक्षणक्षेत्र राजकीय वशिलेबाजीने मक्तेदारीचा फायदा लुटणाऱ्यांनी बजबजले आहे.
 मग अभ्यास होतो कोठे? अभ्यासाच्या निमित्ताने विद्यार्थी शिकवणीच्या वर्गांत जातात. विद्यालयांत वर्ग बुडविणारी टवाळ पोरेही शिकवणीचा वर्ग कधी चुकवीत नाहीत.
 अशा परिस्थितीत शिकवण्यांचे वर्ग बंद केल्याने काय साधणार आहे? प्राप्त परिस्थितीत शिकवण्यांच्या वर्गांनाच परीक्षांसाठी फॉर्म भरण्याची परवानगी देणे अधिक तर्कसंगत होईल. त्यासाठी, मान्यताप्राप्त विद्यालये बंद करण्याची आवश्यकता नाही. त्यांना शिकवणीच्या वर्गांबरोबर स्पर्धेत उतरण्यास भाग पाडले पाहिजे. विद्यालयात जायचे का शिकवणीच्या वर्गात हा विकल्प विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर खुला राहावा. सरकारने अनुदान विद्यालयांना देऊ नये आणि शिकवणीवर्गांनाही देऊ नये. विद्यार्थी ज्या प्रमाणात प्रवेश घेतील त्यातून जमेल त्याप्रमाणे शिक्षकांच्या वेतनश्रेणी ठरविण्यात याव्यात. परंपरागत अर्थाने शिक्षणाची पातळी उंचावेल किंवा नाही हे सांगणे कठीण आहे; पण निदान भ्रष्टाचार आणि खोटेपणा यांचा शिक्षणक्षेत्रातील पगडातरी कमी होईल.

दि. १३/६/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ५२