पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने अहवाल सादर केला होता. मायदेशी कर्तव्यशून्य दिसणारे परदेशांतील अनिवासी भारतीय धडाडीने आणि कर्तृत्वाने गाजतात याचे कारण साधे आणि सोपे आहे. येथे पूर्वकाळी धार्मिक, सामाजिक बंधनांनी आणि वर्तमानकाळात लायसन्स-परमिट बंधनांनी माणसाला जेरबंद करून टाकलेले आहे. परदेशात येथला माणूस गेला, की त्याला पटकन् फरक जाणवतो तो असा - या नव्या देशात पैसा कमावणे, कर्तबगारी दाखविणे आणि चांगले राहणे हे पाप समजले जात नाही आणि दुसरी गोष्ट, तुमच्या अंगी हिंमत आणि कर्तृत्व असेल तर तुम्हाला कोणीही अटकाव करू शकत नाही. भाकड नैतिकता आणि लायसन्स-परमिट राज यांनी जखडलेला माणूस भारतात निकामी ठरतो. या दोन बंधनांतून मुक्तता झाली म्हणजे पौरुषास अटक राहिली नाही, की त्याला साहजिकच त्याच्या आकांक्षांपुढे गगन ठेंगणे वाटू लागते.
 महात्मा गांधींचे एक प्रख्यात वाक्य आहे, त्याचा मथितार्थ असा – गरिबांना मदत करायच्या गप्पा कशाला? त्यांच्या छातीवरून उठा म्हणजे गरिबी आपोआप दूर होते. भारतीयांची कीर्ती उजळून निघावी आणि जगभर पसरावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी प्रोत्साहनाचे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, हिरमोड करणारी बंधने संपवावीत म्हणजे मग निवासी भारतीयसुद्धा जगभर कर्तबगार म्हणून स्थान मिळवील.

दि. ७/६/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ४७