पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असत. त्याचे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक अध:पतन होत जाते आणि अंततोगत्वा विनाश होतो, अशी ग्रीक पुराणातील कथा आहे. भारतवर्ष असाच पछाडलेला भूप्रदेश आहे. दक्षिणेतून द्रविड आले, लय पावले. उत्तरेतून आर्य आले ते संपले. मुसलमानांचा दिग्विजय येथेच थांबला. समुद्रमार्गाने इंग्रज येथे आले आणि त्यांच्या साम्राज्यावर कधीही न मावळणारा सूर्य ढळला.
 ऐतिहासिक उदाहरणे सोडून दिली तरी अगदी सर्वसामान्यांच्या आयुष्यातही हा परिणाम दिसून येतो. अद्ययावत् ऐवजी श्रुतिस्मृतिपुराणोक्ताची निष्ठा सर्वदूर तयार होते. चांगले चांगले विद्वान पदवीधरही बाबामहाराजांसमोर अंगारेधुपारे करू लागतात. कोणताही नवा प्रकल्प पुढे आला की त्याची अंमलबजावणी करणे किती दुष्कर आहे, किंबहुना, अशक्य आहे हे तावातावाने सांगणाऱ्या मंडळींचे पीक येथे उदंड. आपण फार कर्तबगार, बुद्धिमान पण भोवतालची परिस्थितीच अशी की आपले काही चालत नाही असे रडगाणे जागोजाग विव्हळत असते.
 हा काय प्रकार आहे? मायदेशी कर्तबगारीशून्य म्हणून हिणवली गेलेली ही मंडळी अमेरिकेच्या किनाऱ्याचा स्पर्श होताच कायापालट झाल्यासारखी कर्तबगार, बुद्धिमान, धडाडीची म्हणून गाजू कशी लागतात? अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत इंग्लंड-अमेरिकेत भारतीयांची गणना पाकिस्तानी नागरिकांबरोबर पाकी म्हणून होत असे; त्यांचे स्वतंत्र अस्तित्वही जाणवत नव्हते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या ज्यू समाजाचा तेथे मोठा दबदबा आहे. तेथील आर्थिक आणि राजकीय जीवनावर ज्यूंचा मोठा प्रभाव आहे. इटलीतून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेली मंडळी माफिया क्षेत्राततरी मोठा दरारा ठेवून आहेत. अरब नागरिकांच्या हाती तेलाचा काही पैसा असला तर त्यांनाही काही मान मिळतो. बाकी सटरफटर समाज नगण्यच मानले जातात. परवापरवापर्यन्त भारतीयांची गणना या सटरफटर वर्गातच होती. आता त्यांचे स्थान ज्यूंच्या आसपासचेतरी झाले आहे.

 भारताची ऐतिहासिक परंपरा शतकानुशतके जगज्जेत्यांची अवनती घडवून आणण्याची. अमेरिकेची परंपरा न्यूयार्क येथील, हातात मशाल धरून उभ्या असलेल्या स्वतंत्रतादेवीच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरच लिहिलेली आहे - हे, जगातील श्रांत, दुःखी मानवांनो, माझ्या आश्रयाला या. सिर्क खंडाच्या रहिवाशांना एकदम जगज्जेते बनविण्याचा हा चमत्कार उद्भवतो कोठून?
 फरक काही भूगोलाचा नाही, हवापाण्याचाही नाही. १९९१ मध्ये समाजवादापासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या वेळी मान्टेकसिंग

अन्वयार्थ – दोन / ४६