पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ससा लागे लांडग्यापाठी


 मागील आठवड्यात वर्तमानपत्रांतले (३ मे २०००) महत्त्वाचे मथळे ओरडून सांगत होते की, शेअर बाजारातील किमती धाडकन कोसळल्या. वित्तमंत्र्यांनी अंदाजपत्रकात ज्या ज्या वस्तूंच्या किंमती वाढविल्या त्या सगळ्या कमी कराव्या याबद्दल लोकसभेत मोठा धिंगाणा होणार आहे अशी बातमीही ठळकपणे मिरवून गेली. पश्चिम भारतात सर्वत्र पाण्याच्या तुटवड्याने आणि दुष्काळाने रौद्र स्वरूप धारण केले आहे. २१व्या शतकाच्या गोष्टी हरघडी ऐकू येतात. नवीन सहस्रकात भारत कोणती देदीप्यमान शिखरे गाठू शकेल याविषयी बढाया मारल्या जातात. यंदाच्या दुष्काळाने या सगळ्या बढाईखोरांच्या थोबाडीत मारून हिंदुस्थान अजूनही गरीब देश आहे, पावसाने जरा डोळे वटारले तर मरणाची वेळ येऊन जीव कासावीस होतो हे स्पष्ट केले.

 या सगळ्या बातम्या मोठ्या महत्त्वाच्या; पण त्यांचा परिणाम फार काळ टिकणारा नाही. शेअर बाजारातील किमती चढतील उतरतील. लोकसभेत धिंगाणे चालू राहतील. पहिला पाऊस आला, की दुष्काळाच्या भयाणतेची आठवणसुद्धा कोणाला रहाणार नाही. एका घटनेचा परिणाम मात्र दीर्घ काळ टिकणारा आणि सगळ्या जगभर जाणवणारा असा होणार आहे. या घटनेसंबंधीची बातमी फारशी कोठे झळकली नाही. पत्रकार कुत्रा माणसाला चावल्याच्या बातम्या देत नाहीत; माणूस कुत्र्याला चावला तर काही जगावेगळे घडले म्हणून बातम्या छापतात. पण, त्यांनीसुद्धा या घटनेकडे दुर्लक्ष केले. घटना माणसाने कुत्र्याला चावण्याची नाही. विक्रमादित्य राजाला राजधानीसाठी जागा शोधता शोधता, एक ससा लांडग्याच्या मागे लागला आहे आणि लांडगा भेदरून पळत सुटला आहे असे दृश्य दिसले. आजची खरी महत्त्वाची घटना सशाने लांडग्याला हुसकावून लावावे अशा प्रकारची आहे, पाकिस्तानातील.

अन्वयार्थ – दोन / ४०