पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनादर होतो आहे हा त्यांच्या अनुयायांचा आणि काँग्रेस पक्षाचा संधिसाधू कांगावखोरपणा आहे. दलितांकरिता राखीव जागांची तरतूद आहे. तिची मुदतवाढ करण्यात आली तेव्हा कोणाही दलित नेत्याने स्वतः बाबासाहेबांनीच राखीव जागांच्या योजनेस निश्चित कालमर्यादा घालून दिली होती, असा युक्तिवाद केला नाही. या विषयावर काँग्रेसची भूमिका तर इतकी तकलादू आहे, की त्या विषयी बोलण्यालिहिण्यातही तथ्य नाही. भारतीय प्रजासत्ताकाची घोषणा झाल्यानंतर दीड वर्षाच्या आत काँग्रेस पक्षाने तिची मोडतोड चालू केली, खासगी मालमत्तेचा हक्क खलास करून टाकला, शेतकऱ्यांना जमीनविषयक कायद्यांविरुद्ध न्यायालयात दादही मागता येऊ नये अशी तरतूद करणारे ९ वे परिशिष्ट घटनेत घुसडले. एक नाही, दोन नाही, एकोणऐंशी वेळा घटनेत दुरुस्त्या करून घटनेतील निम्म्याअधिक तरतुदी संपविल्या त्या काँग्रेस पक्षाने. एकदा पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली आणि दुसऱ्यांदा सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली असे दोन वेळा घटनेची सम्यक् पाहणी करणाऱ्या समित्या काँग्रेसनेच नेमल्या. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर केवळ खुर्ची टिकविण्यासाठी, अकांडतांडव करून इंदिरा गांधी यांनी घटनेस अक्षरशः पायदळी तुडविले. हा असला इतिहास पहाता, काँग्रेसचे मांजर उंदीर खाऊन खाऊन कंटाळल्यानंतर काशीयात्रेस जाण्यास निघाले, हे उघड आहे.
 घटना समितीत भाषण करताना बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकन घटनेचे एक शिल्पकार जेफर्सन यांचा आधार घेऊन, एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. देशाची घटना ही काही सकाळसंध्याकाळ फेरबदल करण्याची गोष्ट नाही. कोणत्याही कायद्यात संशोधन करण्यासाठी ज्या तरतुदी असतात त्यापेक्षा घटनेत बदल करण्यासंबंधीच्या तरतुदी थोड्या अधिक कसोशीच्या असल्या पाहिजेत हे उघड आहे. या दृष्टीने घटना बदलासाठी विशेष बहुमताची गरज, राज्यविधानसभांची मान्यता आणि राष्ट्रपतींची संमती अशी व्यवस्था ठेवलेली आहे. पण, घटनेत बदल करणेच नाही अशी पोथीनिष्ठा तयार झाली तर घटनेच्या आधाराने, मरून गेलेल्या पिढ्यांचे राज्य नवीन पिढ्यांवर चालू राहील. बाबासाहेब आंबेडकरांचे आजचे अनुयायी खुद्द आंबेडकरांचेही लिखाण फारसे वाचत नाहीत, नाही तर घटनेच्या पुनर्पाहणीची योजना म्हणजे बाबासाहेबांचा अपमान आहे असला सनातनी ब्राह्मणी कांगावा त्यांनी केला नसता.

 कोणीही व्यक्ती निर्दोष असत नाही आणि कोणताही ग्रंथ सदासर्वकाळ प्रमाण राहू शकत नाही. ग्रंथप्रामाण्य आणि व्यक्तिपूजा यांची कास दलित नेते

अन्वयार्थ – दोन / ३४