पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरविले आहे असा कांगावा केला. सासूबाई इंदिरा गांधी भाषणात विरोधी पक्षांवर परदेशी हस्तक वगैरे असल्याचे आरोप करीत तेव्हा त्यांच्या आवाजाला खोटेपणा धकवून नेण्याची जी एक धार येई तिचा प्रत्यय सोनिया गांधींच्या भाषणवाचनातही आला. घटनेच्या पुनर्रचनेचा प्रश्न आता विवेकबुद्धीचा राहिला नसून भावनेचा आणि अभिनिवेशाचा झाला आहे.
 भारताचे पहिले गणराज्य कोसळले आहे आणि दुसऱ्या गणराज्याची स्थापना होणे निकडीचे झाले आहे असे मी स्पष्टपणे १९८७ मध्येच मांडले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील समाजवादाचा प्रयोग फसला, नियोजनामुळे अर्थव्यवस्था ढासळली, देशात फुटीर प्रवृत्ती बळावू लागल्या आणि जाती व धर्म यांच्या आधाराने मते पदरात पाडून घेणाऱ्यांचा जोर वाढू लागला. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळच्या परिस्थितीत मोठा फरक पडला, त्यामुळे दुसऱ्या गणराज्याची स्थापना व्हावी असे मी सुचविले होते.
 पण, त्याबरोबरच एक मुद्दा स्पष्ट केला होता, की दुसऱ्या गणराज्यासाठी नवीन घटना समितीची आवश्यकता नाही. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाच्या शासनाने घटनेला धुडकावून लावून तिची पायमल्ली केली, त्यामुळे देश अधोगतीला गेला. उदाहरणार्थ, भारतीय घटनेत नियोजन मंडळाचा कोठे उल्लेखसुद्धा नाही आणि तरीही नियोजन मंडळ तयार झाले, त्याचा विस्तार झाला, ते फोफावले आणि सर्व अर्थव्यवस्था त्याच्याच कब्जात आली. नियोजन मंडळ दूर करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची गरज नाही, घटना कसोशीने अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यानंतर नोकरी श्रेष्ठ झाली, नोकरशहांचा बडेजाव वाढला. लाल फितीचे वर्चस्व दूर करण्याकरिता घटना दुरुस्तीची काहीच आवश्यकता नाही, त्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची तेवढी गरज आहे.

 पहिले गणराज्य संपले, दुसरे सुरू होऊन गेले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतापर्यंत फ्रान्स देशात पाच गणराज्ये झाली, पाच नवीन घटना तयार झाल्या. आपल्या देशात औपचारिकरीत्या दुसऱ्या गणराज्याची घोषणा झाली नाही; पण समाजवाद कोसळला. एका राजकीय पक्षाचे निर्विवाद बहुमत संसदेत राही ना. आघाड्यांची सरकारे बनू लागली, ती वारंवार कोसळू लागली. तीन वर्षांत तीन वेळा लोकसभेच्या निवडणुका घ्याव्या लागल्या. या सगळ्यांचा अर्थ असा, की १९५१ सालची परिस्थिती राहिलेली नाही. आवश्यक असेल तर, नव्या परिस्थितीस अधिक श्रेयस्कर असे काही बदल घटनेत आवश्यक आहेत काय? याचा विचार करण्यामध्ये बाबासाहेबांच्या स्मृतीचा कोणताही अपमान नाही. बाबासाहेबांचा

अन्वयार्थ - दोन / ३३