पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/293

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाकाम ठरवले, यामुळे अनेक तथाकथित प्रागतिकांचा त्यांच्यावर रोष आहेच. अलीकडे बुद्धाच्या मूर्ती पाडण्याचे रानवट काम तालिबानने, कोणाचीही पर्वा न करता, पुरे केले याबद्दलही त्यांच्यावर राग आहे. 'विनाश काले' सर्व रावणदुर्योधनांना स्त्रीजातीची छेड काढण्याची दुर्बुद्धी होते; तसेच तालिबानने स्त्रियांना गोशात ढकलून त्यांच्यावर जाचक निर्बंध लादण्याचा जो कार्यक्रम चालविला आहे, त्यामुळेही असेल.
 मॅनहॅटनमधील मनोरे कोसळताना हा घातपात कोणी केला यासंबंधी जवळजवळ सगळ्यांची मनोमन खात्रीच पटली. अफगाणिस्तानात काय व्हायचे ते होवो, लादेन यालाही काय शिक्षा व्हायची ती होवो; ११ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या इतिहासातील नव्या कालखंडात जागतिक स्तरावर सुबुद्ध न्यायव्यवस्था तयार झाली नाही तर पळवलेल्या विमानाचे हत्यार अण्वस्त्रापेक्षाही जगाच्या भवितव्यासाठी घातक ठरेल.

■ ■

अन्वयार्थ – दोन / २९५