पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/291

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मंडळी, आपण त्या गावचेच नाही असा संभावितपणाचा आव आणून, आपला आतंकवादाला विरोध अहमहमिकेने गर्जून सांगत आहेत. पाकिस्तानदेखील आपण सतत अतिरेक्यांना विरोध केला आहे असे गर्जून सांगू लागला, तर भारताला तर आतंकवादाच्या विरोधातील आपले प्रयत्न सफल होण्याची संधीच चालून आली आहे असे वाटावे यात काय आश्चर्य?
 मॅनहॅटनमधील जागतिक व्यापार केंद्राचे मनोरे कोसळले, पेंटॅगॉनवर हल्ला झाला. ही घातपाती कृत्ये करणाऱ्यांना जबर शिक्षा करण्याच्या घोषणा झाल्या. पण, हा घातपात नेमका घडवला कोणी याबाबत फारशी स्पष्टता नाही. अफगाणिस्तानात मुक्काम ठोकून असलेल्या ओसामा बिन लादेन याच्याबद्दल अमेरिकन नेते आणि लोक यांच्या मनात अनेक वर्षे पराकोटीचा दुस्वास आहे. सहा वर्षांपूर्वी ओक्लहामा येथील विस्फोटानंतर हे लादेनचेच कृत्य असल्याचे घोषित झाले; नंतर मात्र, घातपाताचे सारेच प्रकरण 'स्वदेशी' असल्याचे निष्पन्न झाले. या वेळीही, ११ सप्टेंबरच्या हल्ल्यात आपला काही हात नाही असा निर्वाळा साऱ्या पॅलेस्टिनी घातपाती संघटनांनी दिला. लादेन यानेही दिला. एवढ्या प्रचंड कर्तृत्वाचे जनकत्व ज्या नेत्याने विश्वामित्री पवित्र्याने नाकारले. जपानमधील 'लाल सैन्या'ने हा घातपात आपण घडवून आणला असल्याची घोषणा केली, तिकडे कोणी लक्ष दिले नाही. साक्षीपुरावा फारसा न पाहता लादेन हाच गुन्हेगार असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जाहीर करून टाकले. अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची सर्व तयारी झपाट्याने होत आहे आणि परवापरवापर्यंत ज्या पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची मागणी होत होती, त्या पाकिस्तानलाच आतंकवादाविरोधाच्या चढाईत अग्रमानाच्या दोस्ताचे स्थान मिळाले आहे.
 या हल्ल्याबद्दल हिंदुस्थानात सर्वसाधारणपणे संतोषाची भावना आहे. मुसलमानी वर्चस्वाचे पारिपत्य आपल्या हातून होत नाही, तर परस्पर अमेरिकेसारख्या महासत्तेकडून ते होत आहे याचे एक नपुंसक समाधान हिंदुत्ववाद्यांना वाटत आहे.

 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा निर्णय आधीच केलेला आहे. 'चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा (Barking up the wrong tree) तर हा प्रकार नाही ना?' असे विचारल्यावर, 'आम्ही पुष्कळ संन्यासी धरले आहेत,' हे उत्तर शाब्दिक कोटी म्हणून ठीक आहे; पण त्याचा अर्थ महागंभीर आहे. पहिल्यांदा अमेरिका ठरवेल त्या देशावर हल्ला करायचा; सारा

अन्वयार्थ – दोन / २९३