पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/290

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हौतात्म्य पत्करून अमेरिकन राष्ट्रावर असा मर्मस्थानी प्रहार केला, की मागील दोनही महायुद्धांत कधी अनुभवास न आलेला विध्वंस अमेरिकेस सोसावा लागला.
 तिसरे एक विमान तर अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यालयाच्या जगप्रसिद्ध पंचकोनी 'पेंटॅगॉन' इमारतीवर जाऊन आदळले.
 जगभरात वेगवेगळ्या देशांत असंतुष्ट आत्मे आणि समाज अनेक आहेत. आपल्यावर असहनीय अन्याय होत आहे आणि तो दूर करण्याकरिता, आवश्यक तर प्राण पणाला लावण्याची तयारी शंभर-दोनशेतरी तरुणांत असणारे अनेक समाज आहेत. असे समाज अतिरेकी हत्याकांडाचे साधन गेली ३० वर्षेतरी वेगवेगळ्या पद्धतींनी वापरीत आहेत. आपल्या देशातही पंजाब, ईशान्य प्रदेश, काश्मीर येथील आतंकवादी आणि नक्षलवादी यांच्या अतिरेकी कारवायांचा अनुभव आला आहे. असंतोषाच्या या प्रदेशात विमाने पळविण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. विमानाच्या चाचेगिरीस कधीमधी मान्यवर राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे; पण विमानाची चाचेगिरी म्हणजे केवळ खंडणी गोळा करण्याचे आणि काही साथीदारांची सुटका करून घेण्याचे साधन न राहता आक्रमक लढाईचे हत्यार म्हणून वापरले गेले तर काय हाहा:कार माजेल याच्या कल्पनेनेच थरकाप होतो.
 अतिरेक्यांनी हे नवीन हत्यार हाती घेतले आहे आणि तेदेखील अमेरिकेसारख्या आर्थिक आणि लष्करी महासत्तेविरुद्ध. तेव्हा या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काहीतरी करणे अमेरिकेतील आणि जगातील इतर राज्यकर्त्यांना आवश्यकच होते.
 ११ सप्टेंबरनंतर सशस्त्र दलांची आयुधांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एके काळी सर्वसामान्य माणसाच्या हाती आणि घरी हत्यारे असत. आवश्यकतेप्रमाणे तो ती स्वसंरक्षणार्थ वापरू शकत असे. तशीच परिस्थिती पुन्हा तयार होत आहे. पारंपरिक शस्त्रे आणि अण्वस्त्रे किचकट आणि महागडी म्हणून कालबाह्य ठरत आहेत. शस्त्रास्त्रांचे खासगीकरण झाले आहे आणि जिवाच्या निर्धाराने निघालेला कोणीही थोड्याफार तयारीने प्रचंड उत्पात घडवून आणू शकतो अशी परिस्थिती तयार होत आहे.

 शस्त्रास्त्रांची आपली मक्तेदारी संपुष्टात येत आहे हे पाहता जगभरच्या सरकारांनी आतंकवादाविरुद्ध गिल्ला करावा हे समजण्यासारखे आहे. गेली काही दशके ज्यांनी आतंकवादाचा अप्रच्छन्न आणि छुपा वापर केला तीही

अन्वयार्थ – दोन / २९२