पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बरोबरीची चुरस चालली होती. सामन्याचा वेळ संपत आला होता. उरलेल्या वेळात कोणता संघ आघाडी घेतो याबद्दल मोठे तणावाचे वातावरण तयार झाले होते. प्रोत्साहनाच्या आरोळ्या, त्याबरोबर बॅण्ड, वाद्ये इत्यादींच्या आवाजाने सगळा कोलाहल माजला होता. तेवढ्यात एका संघाचे समर्थक उभे राहिले आणि त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली. प्रार्थना दोनच मिनिटे चालली असेल; पण त्यामुळे वातावरणात पराकोटीचा बदल घडून आला. प्रोत्साहनासाठी आजपर्यंत वर्षानुवर्षे वापरण्यात आलेले सारे प्रकार मर्कटचेष्टा वाटू लागल्या. ज्यांच्या बाजूने प्रार्थना म्हटली गेली त्या संघाने उरलेल्या वेळात दोन गोल केले आणि सामना जिंकला.
 साराच प्रकार मोठा विलक्षण! अमेरिकेत शासन हे निखळ निधार्मिक आहे. न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे, सरकारी अनुदान मिळणाऱ्या साऱ्या शाळांत आणि महाविद्यालयांत कोणत्याही धर्माची प्रार्थना म्हणता येत नाही. फूटबॉलच्या सामन्यातील प्रार्थनेचा लोकविलक्षण प्रकार घडला आणि एक नवीनच प्रश्न उभा राहिला - सरकारी अनुदान मिळणाऱ्या शाळांच्या सामन्यांत किंवा सरकारने भरविलेल्या क्रीडास्पर्धांत प्रोत्साहनाचे एक साधन म्हणून प्रेक्षकांनी धार्मिक प्रार्थना वापरणे कितपत योग्य आहे?
 इंग्रजी अमलाच्या काळात भारतात क्रिकेटचे पंचरंगी सामने खेळले जात. हिंदु, मुसलमान, शीख, पारशी, युरोपियन इत्यादी धर्मपंथांचे स्वतंत्र संघ असत आणि त्यांच्यात मोठे अटीतटीचे सामने होत. या सामन्यांच्या वेळी हर हर महादेव, अल्ला हो अकबर अशा धर्तीच्या धार्मिक घोषणा होत. पण, सामन्यांवरून कोठे जातीय दंगल उद्भवली नाही. फाळणीच्या आधी जातीय दंगली उफाळन येऊ लागल्या तसे पंचरंगी सामने बंद झाले.

 अमेरिकेत असाच प्रश्न उभा केला गेला. आज एका धर्माच्या अनुयायांनी प्रार्थना म्हटली, उद्या दुसऱ्या कोणत्या धर्मीयांनी त्यांची प्रार्थना म्हटली तर थोड्याच दिवसांत फूटबॉलचे मैदान प्रार्थनायुद्धाचे रणक्षेत्र होण्यास वेळ लागणार नाही, जातीय तेढ वाढीस लागेल या भीतीपोटी हे प्रकरण न्यायालयात गेले. सार्वजनीक जागी प्रार्थनेचा उपयोग करणे योग्य आहे का? त्याला शासनाने बंदी घालणे योग्य होईल काय? अशी बंदी घातली तर त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा येते काय? असे सारे प्रश्न न्यायालयासमोर उभे केले गेले. मी ज्या दिवशी अमेरिकेत पोहोचलो त्याच दिवशी याविषयी न्यायालयाचा निर्णय जाहीर झाला. सार्वजनिक जागी प्रार्थनांचा उपयोग कोणत्याही एका संघाचे मनोधैर्य

अन्वयार्थ – दोन / ३०