पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/261

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घेतला. मुबईच्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राने तयार केलेले उत्सर्जनप्रक्रियेचे बियाणे मिळवले. मोठे छान पीक आले. पण, खवटपणा काही कमी करता आला नव्हता. शेंगेतील आर्द्रता झपाट्याने कमी करायला हवी यासाठी अनेक प्रयोग करून पाहिले. शेंगेतील आर्द्रता कमी होईना तेव्हा फोलकट काढून दाण्यातील आर्द्रता कमी करून ठेवली. प्रत्येक दाणा एका बदामाच्या वजनाचा, चांगला कुरकुरीत झालेला. माझ्या घरी येणारे पाहुणे बरेच महिने त्याची प्रशंसा करीत त्याचा आस्वाद घेत होते.
 तेवढ्यात, चाकणचे कांदा आंदोलन सुरू झाले. उपवास, तुरुंगवास यांत हे सगळे प्रकरण मगे पडून गेले. चटकमटक खाद्य म्हणून दाणे उत्तम, पण आठदहा पोती दाणे घरी थोडेच संपणार? चाकणच्या बाजारात त्याला गिऱ्हाईक भेटेना. तेथील सारे खरीददार तेल गाळण्याकरीता मिळेल तसला भुईमूग खरेदी करणारे; त्यांना असल्या मालाची काय कदर? शेवटी साध्या खवट भुईमुगापेक्षाही कमी किमतीने ती पोती विकून मोकळे व्हावे लागले!
 शेतीमालाच्या भावाच्या आंदोलनाआधी, शेतीमालाच्या संबंधी सरकारच्या कूटनीतीचे पूर्ण आकलन होण्याआधी तथाकथित विधायक मार्गाचे मी जे प्रयोग केले, त्यांतील हा पहिला. त्यानंतर बटाटा, कांदा यांच्या प्रक्रियेचे प्रयोग झाले. बरीच रक्कम आणि कष्ट अक्कलखाती जमा झाले.
 वीस वर्षांहून अधिक काळ मधे गेला; पण, शुद्ध दाणा आपल्याला करता आला नाही याची बोच राहिली होती. जागतिक व्यापार संस्थेसंबंधीच्या टास्क फोर्सचे अध्यक्षपद घेतल्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला तो खाद्यतेलासंबंधी. हिंदुस्थानातील खाद्यतेलाचे संकट पेट्रोलियमच्या दुर्भिक्ष्यापेक्षाही अधिक कठीण. तेलबिया आणि खाद्यतेल यांचे देशातील उत्पादन वाढविण्याकरिता विचार सुरू झाला. मी काही सरकारात नाही, एका विषयापुरता सल्लागार आहे; तरीही हाती असलेल्या पदाचा वापर करून सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि महाराष्ट्र या राज्यांत भुईमुगाचे उत्तम बियाणे तयार करण्याचे प्रकल्प सुरू केले; त्याचे मुख्य श्रेय डॉ. बसू यांना आहे. डॉ. मुक्तिसाधन बसू हे त्यांचे नाव. भुईमुगाच्या शेतकऱ्यांच्या मुक्तीचे ते खरोखरच साधन बनले आहेत.
 या प्रयोगातील यशामुळे मनातील एक जुनी रुखरुख गेली आणि बाजारपेठेची मोकळीक मिळाल्यास भारतीय शेती जागतिक दर्जाची होऊ शकते याबद्दलचा आत्मविश्वास दृढ झाला.

दि. १८/७/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २६३