पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/260

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकदोघांना जाऊन भेटलो. जुन्या स्वित्झर्लंडच्या वासामुळे थोडी सलगी जमली. मी भारतात जाऊन काय खटाटोप करतोय याचे त्यांना कौतुक वाटले. मी मदतीसाठी हात फैलावत नाही तर, निवडक (Hand-picked) भुईमुगाला बाजारपेठ शोधत आहे हे समजल्यावर स्वीस माणसे अधिक आस्थेने व आदराने बोलली.
 मी चौकशी सुरू केलेली पहिलीच बाजारपेठ दरवर्षी ३०० कोटी रुपयांची निवडक शेंगदाण्याची आयात करते. टेलिव्हिजनसमोर बसल्या बसल्या तोंडात टाकण्याचे अनेक पदार्थ पाश्चिमात्य देशांत मोठे लोकप्रिय आहेत. त्यामुळे, शेंगदाणा, मका आणि बटाटे यंचा खप भरपूर आहे. त्या वेळी त्यांची खरेदी प्रामुख्याने इस्रायल आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून होत असे.
 मोठ्या उदारतेने सारी मागणी हिंदुस्थानकडे वळविण्याचे त्यांनी कबूल केले; पण लगेच नाही. या बाजारपेठेचे तीन वर्षांचे आगाऊ करार झालेले होते. १९८२ सालापासून हिंदुस्थानकडून खरेदी करण्याचे त्यांनी मान्य केले. कागदपत्र तयार करण्यासाठी एक अधिकारी समोर आला. त्याने सहज प्रश्न विचारला, "ज्या भागात तुम्ही काम करता आहात तो हिंदुस्थानात नेमका कोठे आहे?"
 त्याला हिंदुस्थानच्या भूगोलाची कितपत माहिती असणार म्हणून मी म्हटले, "मुंबईच्या जवळ."
 "म्हणजे नेमके कोठे?"
 "पुण्याजवळ."
 "पुण्याच्या कोणत्या बाजूला?"
 आता मी जरा सावध झालो. याला महाराष्ट्राची काहीशी माहिती दिसते.
 "पुणे-नाशिक रस्त्यावर."
 "म्हणजे खेड - मंचरच्या बाजूला?"
 आता मला धक्का बसला. आंबेठाण-चाकण येथे आपण जाऊन राहिलो म्हणजे भारतातील कोण्या दुर्गम खेड्यात जाऊन राहिलो हा दंभ गळून पडला. पण, आपला भाग या गोऱ्याला माहीत आहे म्हटल्यावर आनंदही वाटला आणि मी "हो", म्हटले. त्यावर त्याचा आणखी एक धक्का; "मग तुम्हाला अफ्लाटॉक्सिन् काढणे शक्य होणार नाही," त्याने आत्मविश्वासपूर्वक निर्वाळा दिला.
 मीही आव्हान स्वीकारले आणि अफाफ्लाटॉक्सिन्विरहित व खवटपणाचा अंशही नसलेले भुईमुगाचे नमुने दोन वर्षात मी पाठवावेत आणि त्यानंतर दोन वर्षांनी खरेदीचा करार सुरू व्हावा असे ठरले.

 हिंदुस्थानात परतल्यावर मी चंग बांधून कामाला लागलो. त्या क्षेत्रातील

अन्वयार्थ – दोन / २६२