पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आम्हाला असल्या गोष्टींचा काही फारसा त्रास होत नाही. मानसी (शिक्षिका सून) ला सांगितले, की ती सगळे प्रश्न पटकन सोडावते. काम कलेक्टर कचेरीत असो, पोलिस खात्यात असो की आणखी कुठे; शिक्षकांचा निरोप गेला, की एरव्ही दांडगेगिरीकरिता प्रसिद्धी असलेले अधिकारीही अगदी नमून वागतात आणि कामे करून टाकतात. अगदी बालवर्गात प्रवेश मिळवायचा झाला तरी शाळेतल्या शिक्षकांशी ओळख असणे उपयोगी असते. आणि, एरव्हीही मुलांच्या अभ्यासावर देखरेख ठेवणे इत्यादी कामे करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांविषयी आदर आहे, एवढेच नव्हे तर भीती आहे.
 कोणीही कितीही मोठा असो, त्याची मुले नाही तर नातवंडे शाळेत असतातच. शिक्षकांनी शब्द टाकला तर पटकन काम होऊन जाते. मला १९४१ सालच्या, तुटक्या अंगठ्याच्या वहाणा पायात सरकविणाऱ्या पाटकर मास्तरांची आठवण झाली; त्यांच्या चरितार्थाला मदत व्हावी म्हणून महिन्याभराची १ रुपयाची शिकवणी ठेवणारी माझी आईही आठवली.
 मी सध्या राहतो त्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची बदललेली परिस्थिती मला चांगली माहीत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतही प्राथमिक शिक्षक होणे पैशाच्या दृष्टीने मोठे भाग्याचे मानले जाते. शिक्षण क्षेत्रातील पदव्या किंवा पदविका मिळवून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक झाले, की स्वर्गाला हात पोहोचले अशी सर्वसाधारण भावना आहे. त्यात एखाद्या शिक्षिकेशी विवाह झाला म्हणजे विचारायलाच नको. मग दोघांनाही जन्मभर, शक्य तो एका जागी राहता येईल अशा बदल्या मिळविणे आणि त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची मर्जी राखणे एवढाच काय तो आयुष्यभरचा कार्यक्रम राहतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी विचारायलाच नको! इंग्रजी आणि गणिताचा बट्ट्याबोळ. अलीकडे गावातील एक-दोन मुले एस्.एस्.सी. झाली असे ऐकतो.
 स्वातंत्र्यानंतर शेती कनिष्ठ, व्यापार मध्यम आणि नोकरी श्रेष्ठ झाली. त्यामुळे, बेळगावचे पाटकर मास्तर ते आंबेठाणचे मांडेकर गुरुजी एवढे मोठे परिवर्तन झाले. पण, त्यापलीकडे आमच्या फरिदाबादच्या सूनबाई. शाळा सुसज्ज, शिक्षणाचा दर्जाही उत्कृष्ठ आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठाही फार मोठी. एवढा मोठा बदल स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांत दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात काही जाणवला नाही.

दि.५/४/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / २८