पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिसरीतही बसवायला ते तयार होते, पण आमच्या मोठ्या बंधूंनी एकदम निकराचा सूर काढला, शरदला माझ्या वर्गात बसवले तर मी शाळा सोडून देईन. सर्वांचा नाइलाज झाला आणि मी दुसरीत जाऊ लागलो.
 दर शनिवारी सप्ताहिक परीक्षा असायची. मास्तर बेरजा-वजाबाक्यांचे आकडे फळ्यावर लिहून द्यायचे आणि आम्ही उत्तरे पाटीवर लिहायची. बेरजेकरिता मास्तरांचे पाचसहा आकडे फळ्यावर लिहून होईपर्यंत मी उत्तर लिहून टाकायचो. शिकवणी ही मठ्ठ मुलांकरिता असते अशी त्यावेळची पक्की समजूत होती. मग, मीही निकराचा सूर काढला. आईने म्हटले, शिकवणी बाळकरिता आहे; तुझ्याकरिता नाही. पण, मास्तर एवढे येणार आहेत, शिकवणार आहेत; जरा बसलास शेजारी तर काय बिघडणार आहे? थोडेसे पुढचे शिकलास तर पुढच्या वर्षी तुला एकदम चौथीत बसवू. या लालचीने मी तयार झालो. मास्तरांनी अंगठा तुटलेल्या वहाणा पायांत घातल्या आणि दरवाज्याच्या चौकटीतून लांब लांब पावले टाकीत ते निघून गेले.
 आईला मी केलेल्या निषेधाबद्दल थोडी काळजी वाटत असावी. मला बाजूला घेऊन ती म्हणाली, तुला शिकवणीची गरज नाही हे मला कळते, पण मास्तरांना गरज आहे. तुझ्या वडिलांना ४० रुपये पगार आहे तरी आपली किती ओढाताण होते? शाळेमध्ये मास्तरांना महिन्याला ८ रुपये पगार आहे, त्यांनी जगावं कसं? माझी शाळा खासगी. महिन्याला १ रुपया फी द्यावी लागे. बाकीच्या म्युनिसिपालिटीच्या शाळा फुकट असत. अलीकडे इस्त्रीचा स्वच्छ गणवेश घालून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जसा आपला एक थाट वाटतो तसे काहीसे आम्हालाही वाटत असावे.

 परिस्थिती ओढगस्तीची असली तरी त्या काळच्या ब्राह्मण कुटुंबात सर्रास असणारा अभ्यासाचा आग्रह आमच्याकडे थोडा अधिकच असायचा. घरी कायम एकतरी वारकरी मुलगा जेवायला असायचा. अभ्यासात थोडी हयगय झाली तरी आईचे बोलणे ठरलेले, 'तो पाहा, कोणी नाही तरी विद्या संपादन करण्यासाठी किती कष्ट करतो आहे? नाही तर तुम्ही! चारी ठाव खायला मिळते आहे म्हणून मस्ती चढते!' पाठ्यपुस्तकात 'गरीब बिचारा माधुकरी' ही कविता आली त्या वेळी अनवाणी पायाने, डोक्याचा गोटा केलेले आणि सोवळ्यात ताट ठेवून माधुकरी मागणारे विद्यार्थी इतके असत, की ती कविता वाचताना पोटात गोळा उठे; एवढेच नाही, तर डोळ्याला पाणीसुद्धा येई. गरजू विद्यार्थ्याला वार देणे या प्रमाणेच गरजू मास्तरांना मदत व्हावी म्हणून आम्हाला शिकवणी ठेवण्याचा

अन्वयार्थ – दोन / २६