पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महिला आघाडीने दोन लाख स्त्रियांना त्यांच्या पतीच्या जमिनीतील एका भागाची मालकी मिळवून दिली आणि दानपत्राचा कार्यक्रम दोनशेवर गावांनी गावभर सडारांगोळ्या घालून, रोषणाई करून, ढोल लेझीम लावून मिरवणुका काढून साजरा केला ही मोठी लोकविलक्षण गोष्ट आहे. या आंदोलनाला विनोबाजींच्या व्यक्तिमत्वाची कोणी स्त्री-अग्रणी मिळाली असती तर साऱ्या देशात मोठी क्रांती घडून आली असती. अशी अग्रणी मिळेपर्यंत लक्ष्मीमुक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम मी जमेल तसे करीत होतो.
 यवतमाळ जिल्ह्याच्या रावेरी गावी लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम झाला. मोठी सभा झाली. सभेत 'स्त्रियांच्या मालमत्तेचा हक्क हा प्रश्न मांडताना मी, रामामागोमाग वनवासात गेलेल्या सीतेची महाराणी बनल्यानंतर रामाने घरातून काढून लावल्यानंतर काय दैना झाली याचे वर्णन केले.
 सभा झाल्यानंतर गावकरी म्हणाले, "साहेब, तुम्ही कथा सांगितली ती आमच्या गावचीच. वनवासी सीता जंगले तुडवीत तुडवीत आमच्या गावी आली. तिची बाळंतपणाची वेळ झाली होती. लवकुशांना तिने जन्म दिला तो याच गावी."
 माझ्या मनात पुन्हा गोंधळ. रामराज्य सिनेमामुळे, टी.व्ही. वरील रामायणामुळे, परित्यक्ता सीता वल्मिकी ऋषींच्या आश्रमात कालक्रमणा करीत होती, तेथेच लवकुशांचा जन्म झाला आणि वाल्मिकीने त्या दोन बाळांना मोठे केले अशी समजूत पक्की झाली होती. पंजाबातील अमृतसरजवळ एका गावातही 'लवकुशांचा जन्म येथेच झाला' असे आख्यान ऐकले होते.
 रावेरीकर मंडळींना मी विचारले, "काय पुरावा आहे?"
 गावाबाहेर आजही प्रसूतीस्थानी मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी आहे, त्यामुळे ते फारसे प्राचीन नसावे. शेजारी लवकुशांनी बांधून घातलेल्या भीमकाय हनुमानाची मूर्ती आहे. अशी निर्वीर्य हनुमानाची मूर्ती हिंदुस्थानात इतर कोठेही नाही.

 माझ्या चेहेऱ्यावरची संशयाची भावना गावच्या देशमुखांनी ओळखली. "दगडाची देवळे आणि मूर्ती हा काही पुरावा नाही; पण सांगतो ऐका. गावात आणि आसपासच्या प्रदेशात मौखिक परंपरेने चालत आलेली ही कथा आहे. प्रसूतिश्रमांनी क्लांत झालेल्या सीतेने थोडी लापशी करून पिता यावी म्हणून गावकऱ्यांकडे मूठभर गहू मागितले. गावात उपऱ्या आलेल्या या बाईची या लोकांनी हेटाळणी केली; एवढीशी भीक घालण्यालाही नकार दिला आणि अद्भूत घडले. नवजात मुलांना दूधही मिळणार नाही या कल्पनेने सुशांता, संयमधना

अन्वयार्थ – दोन / २३५