पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






मास्तर ते रिंगमास्टर


 वळ जवळ ६० वार्षांपूर्वीची गोष्ट. बेळगाव येथील ठळकवाडीतल्या एका मराठी माध्यमाच्या शाळेत मी दुसरीत होतो. घरी केसरी यायचा. त्यात महायुद्धाच्या इतस्ततः पसरलेल्या ज्वाळा असा ठळक मथळा असलेला एक स्तंभ असे. त्यातल्या इतस्ततःचा नेमका अर्थ काय तो समजत नसे. त्या वेळी महायुद्ध चालू होते एवढे या आठवणीवरून नक्की!
 एका दिवशी सकाळी माझ्या वर्गाचे शिक्षक आमच्या घरी आले. कानडी पद्धतीचे दुटांगी धोतर, नवा असताना गर्द निळ्या रंगाचा असावा असा कोट, सडसडीत बांधा, उंच शरीरयष्टी. आम्ही कोठेतरी उनाडक्या करीत फिरत होतो; आईने हाक मारून घरात येण्याचे फर्मावले. शिक्षक पाहून नवल वाटले; भीती वाटल्याचे काही आठवत नाही. आमच्या शाळेत फक्त हेडमास्तरांचाच काय तो दरारा असे; बाकीचे शिक्षक सारे स्वभावाने गरीब आणि परिस्थितीने गांजलेले. विद्यादानाचे महापुण्य साऱ्या अडचणी सोसून, खऱ्याखुऱ्या निष्ठेने ते चालवीत.
 उद्यापासून सकाळी उंडगायला जायचे नाही, पाटकर मास्तर शिकवणीसाठी येणार आहेत, जरा अभ्यासाकडे थोडे लक्ष द्या. तुम्हाला काही वडिलार्जित जमीन मिळायची नाही: अभ्यासात वर आलात तर ठीक, नाही तर भीक मागायची पाळी येईल. आईचा प्रेमळ फतवा!

 मी पाचसहा वार्षांचा असेन; पण त्या वेळीही आपल्याला शिकवणी ठेवत आहेत यात काही भयंकर अपमान आहे असे स्पष्ट जाणवल्याचे आठवते आहे. मला शिकवणी कशाला? मी विचारले. हेतू, सुटता आले तर या बेडीतून सुटण्याचा असावा. त्याच वर्षी मी शाळेत जाऊ लागलो होतो. घरी मोठा भाऊ बाळ एक वर्ष वरती; त्याच्या बरोबरीने राहिल्याने त्याचेही धडे पाठ झालेले. त्यामुळे, थोडी परीक्षा घेऊन रजपूत मास्तरांनी मला एकदम दुसरीतच बसवले;

अन्वयार्थ – दोन / २५