पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






'तंत्रज्ञानाचे अग्निदिव्य'


 ११ मे २००१ रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशप्रमाणे 'तंत्रज्ञान दिवस' साजरा व्हायचे ठरले होते. प्रत्यक्षात कोठे एखादा किरकोळ सभा-समारंभ झाला असेल. माझ्या तो नजरेत आला नाही; इतर कोणाच्याही तो आला नसावा. त्या दिवशी सकाळच्या वर्तमानपत्रांत भली पानभर जाहिरात मात्र नजरेत भरली. एक पानी जाहिरात म्हणजे कित्येक लाखांचा खर्च; पण कोणत्याही केंद्रीय मंत्रालयाला असल्या खर्चाची फारशी फिकीर वाटत नाही. नागरिकांत उत्साह असल्याखेरीज कोणतेही कार्यक्रम यशस्वी होत नाहीत; जाहिरात दिल्याने खुर्चीत बसल्या बसल्या काम होऊन जाते.

 जाहिरातीच्या अग्रभागी उपराष्ट्रपती व स्वतः पंतप्रधान यांचे फोटो आणि त्याच्या बरोबरच मानवसंसाधन विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान व सागरी विकास मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी आणि शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री बाची सिंग रावत यांचे फोटो आणि संदेश.
 • झपाट्याने एक होणाऱ्या जगात तंत्रज्ञानातील सामर्थ्य जोपासायचे असेल तर आपल्या नीतिमूल्यांची सातत्याने तपासणी करावी लागेल.

- कृष्णकांत, उपराष्ट्रपती

 • नवीन शतकात विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, समाज, शासन आणि पर्यावरण यांचा संगम महत्त्वाचा ठरणार आहे.

- अटल बिहारी वाजपेयी, प्रधानमंत्री

 • भविष्यातील ज्ञान हे सामाजिक गरजांशी निगडित असले पाहिजे, त्यात माणुसकीची जोपासना पाहिजे आणि त्यातून टिकाऊ तंत्रज्ञान उपजले पाहिजे.

- मुरली मनोहर जोशी,
मानवसंसाधन विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान व सागरी विकास मंत्री

अन्वयार्थ - दोन / २२५