पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नावाने कामगार संघटनांची एक परिषद भरवली. शेतकरी चळवळीने सर्वप्रथम डाव्यांना शेतीक्षेत्रातून काढून लावले. आज जमिनीचे फेरवाटप, सामूहिक शेती, शेतीचे राष्ट्रीयकरण असला कार्यक्रम घेऊन कोणतीही कम्युनिस्ट शेतकरी संघटना काम करू शकत नाही. ज्या काही किरकोळ शेतकरी संघटना कम्युनिस्ट पक्षाशी नाते सांगतात त्या जातिवंत समाजवाद्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोचवणाऱ्या 'शेतीमालाच्या रास्त भाव' याच कार्यक्रमावर. हैदराबादच्या परिषदेत भाषणे काय झाली? 'खुलेपणा म्हणजे गुलामी, जागतिकीकरण म्हणजे साम्राज्यवाद!' थोडक्यात उरफाटे समाजवादी शब्दकोश पुन्हा एकदा प्रचलित करण्याइतकी आशा, नव्या व्यवस्थेच्या शिडकाव्याने गारवा झाल्याबरोबर बिळातून बाहेर पडलेल्या भाई लोकांना वाटू लागली आहे. खुली व्यवस्था टाळायची असेल तर शेतीक्रांती झाली पाहीजे असाही सिद्धांत कौशिक कोलकाटा यांनी मांडला. डाव्यांच्या शब्दकोषात कृषिक्रांती याचा अर्थ उत्पादनात वाढ नाही, उत्पादकतेत वाढ नाही, तंत्राज्ञानाचा विकास नाही, बाजारपेठेत उपभोग्य वस्तूंची रेलचेल नाही, कृषिक्रांतीचा डाव्या शब्दकोषातील अर्थ जमिनीचे राष्ट्रीयीकरण समान वाटप किंवा सामूहिकीकरण, हे असे काही घडले तर खुल्या व्यवस्थेकडे जाणारा कालप्रवाह काही काळ खुंटल्यासारखा वाटेलही; परंतु मनुष्य आणि मानवी समाज यांचा अखंड वाढत्या स्वातंत्र्याचा शोध थांबवणे कोणाही हुकूमशहाला आजपर्यंत जमले नाही. यापुढेही जमणार नाही. समाजवादी पुन्हा एकदा नादान कर्तृत्वहीनांच्या असंतोषाचा फायदा घेऊन सत्तेवर येतीलही; पण त्यांचे राज्य टिकणार नाही, समाजवादाचा दुसरा अवतार ७० महिनेही टिकणार नाही. ७० वर्षांच्या समाजवादी साम्राज्याची सारी पापे जनतेने पोटात घातली. दुसऱ्या पतनाच्या वेळी इतकी क्षमाशीलता दुष्कर होईल. खऱ्या स्वातंत्रतावाद्यांना असला प्रतिशोध रुचणारा नाही; पण समूहवादाच्या विषवल्लीचे समूळ उच्चाटन इतिहासात व्हायचे असेल तर त्यासाठी परिणामकारक साधन इतिहासच ठरवेल.

दि. १८/४/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २१२