पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरलीच नसती तर भारतातील नेतेमंडळींना आनंद झाला असता; पाच तासांची भेट ठरल्यानंतर कशी जिरली भारताची अशी काहीशी प्रतिक्रिया पाकिस्तानी पुढाऱ्यांची!
 पारिजातकाच्या फुलांवरून सत्यभामा आणि रुख्मिणी यांचे वितुष्ट झाले आणि श्रीकृष्ण दोघींची समजूत काढण्यास अंतःपुराकडे निघाला असा हा प्रसंग. दोघी क्रुद्ध सवतींचे बुझावी हरि तेंचि लीळा वदावी असे वामन पंडिताने सुरस वर्णन केले आहे. श्रीकृष्ण क्लिंटन यांची भारतीय उपखंडाच्या भेटीच्या सात दिवसांतील सर्व कामगिरी या दृष्टिकोनातून समजून घेतली पाहिजे.
 क्लिंटन आल्या आल्या बांगला देशला गेले. एका इस्लामिक राष्ट्रातील यशस्वी लोकशाही पद्धतीची त्यांनी वाखाणणी केली. शिक्षण आणि पर्यावरण यांकरिता भरभक्कम देणगी जाहीर केली. बांगलादेशमधील नागरिकांच्या मनांतील एक अभिमानस्थळ त्यांनी नेमके हेरले - लोकशाही यशस्वी करणारे इस्लामिक राष्ट्र आणि साऱ्यांची वाहवा मिळविली.
 भारतात आले. राष्ट्रपतींनी केलेल्या स्वागतसमारंभात अतिरेक्यांच्या कारवायांबद्दल आणि पाकिस्तानच्या छुप्या आक्रमणाबद्दल भारताशी सहमती स्पष्ट केली, राजघाटावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. एव्हाना सारे भारतीय मोनिका लेवेन्स्की प्रकरणातील सारी बदनामी पार विसरून गेले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढील क्लिंटन यांचे भाषण म्हणजे वर्षानुवर्षे बारकाईने अभ्यास करावा अशी करामत होती. समोर दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बोलतो आहे, की आपल्याच शासनाची तरफदारी करणारा कोणी वक्ता बोलतो आहे असा संभ्रम पडावा इतके क्लिंटन साहेब अभिनिवेशाने बोलले. पाकिस्तानला थोडे फटकारले. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हिंदुस्थानात येतो, भारताचा पक्ष धरतो, पाकिस्तानला दटावतो म्हणजे भारतीयांच्या अभिमानस्थानाची तार कुशलतेने छेडणेच होते! क्लिंटन यांनी साऱ्या सांसदांवर भूल टाकली असे साऱ्या वर्तमानपत्रांनी म्हटले.

 प्रसिद्ध फ्रेंच मुत्सद्दी कॅसानोव्हा याची, त्याच्या अनेक स्त्रियांशी असलेल्या प्रकरणांबद्दल मोठी ख्याती होती आणि आहे. अगदी सामान्य रूपाच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या कॅसानोव्हावर इतक्या रूपगर्विता भाळल्या कशा याचे रहस्य स्वतः कॅसानोव्हानेच सांगितले आहे. प्रत्येक स्त्रीचा - अगदी सामान्यातील सामान्य स्त्रीचासुद्धा - एक अहंकारबिंदू असतो. कोणाला आपल्या नाकाचा, कोणाला डोळ्यांचा, कोणाला केसांचा, कोणाला अंगयष्टीचा, कोणाला चालण्याचा, कोणाला हसण्याचा तर कोणाला बोलण्याचा… जितक्या स्त्रिया तितकी

अन्वयार्थ – दोन / २३