पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेणार आहे, पुन्हा एकदा आपले सोन्याचे दिवस येणार आहेत ही आशा मनात ठेवून जागोजाग दबा धरून आहेत. समाजवादाच्या काळात बांधल्या गेलेल्या मोठ्या धरणांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करणारे तद्दन मोठ्या धरणांच्या मागे साम्राज्यशाही कट असल्याचा शोध सांगत आहेत. जगभर एकसंध लाल साम्राज्य तयार करण्याचा आंतरराष्ट्रवाद मांडणारे आणि राष्ट्र या संकल्पनेचीच कुचेष्टा करणारे कॉम्रेड आता जागतिकीकरण आणि WTO यांचा निषेध करण्यासाठी गांधीवादी आणि भगवी स्वदेशीवाले यांच्याशी मेतकूट जमवून आहेत. खुलेपणात साऱ्या ऐतखाऊंचे पितळ उघडे पडणार, युनियनच्या ताकदीवर भरमसाट फायदे उपटलेले कामगार जागतिक स्पर्धेसाठी कार्यक्षमता दाखवणे भाग पडले तर नाराज होणार. त्या असंतोषातून पुन्हा एकदा समाजवादी क्रांतीचा पुनर्भव होणार अशी स्वप्ने पाहत आहेत.
 याच्या उलट घडले असते तर काय चित्र दिसले असते? १९८५ च्या सुमारास बिगर समाजवादी देशांत मोठी आर्थिक मंदी येऊ घातली होती. मंदीची लाट प्रत्यक्षात येऊन कोसळली असती आणि परिणामतः नियोजनविरहित अर्थव्यवस्थेची सारी राष्ट्रे गुडघे टेकून समाजवादी रशियाकडे 'दे, हाता शरणागता,' म्हणून गेली असती तर स्वतंत्रतावादी विचारवंतांना कार्यकर्त्यांना लपण्यापुरता तरी आडोसा राहिला असता काय? इतिहास असे सांगतो, की उन्मत्त समाजवाद्यांनी विजयाच्या बेहोशीत लक्षावधी लोकांच्या कत्तली करून टाकल्या. व्यक्तीचे स्वातंत्र्य, बाजारपेठेची कार्यक्षमता आणि गुणवत्ता हे शब्ददेखील शब्दकोषातून हुकूमशहांनी काढून टाकले असते.
 जागतिक व्यापारसंस्था आणि खुला व्यापार यात कर्तृत्वहीन नादान लोकांचे नेतृत्व करून, पुन्हा एकदा इतिहास उलटा फिरवण्याचा प्रयत्न कॉम्रेड करताहेत. त्यांची काय ती वासलात इतिहास लावेलच. आपल्याला कोणत्याही Stalag (युद्धकैद्यांच्या छावणी) मध्ये कुजावे लागणार नाही आणि बंदुकीच्या फैरींना सामोरे जावे लागणार नाही याची मनात खात्री पटल्यामुळे असली ठोकशाहीच समजू शकणारे आता अधिकाधिक धीट बनू लागले आहेत आणि हाती सत्ता नसतानादेखील इतिहास, विज्ञान आणि अर्थशास्त्र उलटेपालटे करू पाहताहेत. ही महंमद घोरी आणि पृथ्वीराज यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे. पृथ्वीराजाकडून तीन वेळा जीवदान मिळालेला घोरी एकदा पृथ्वीराज हाती लागल्यावर त्याचे अनन्वित हाल करण्यास डोळे काढण्यास सरसावला.

 १० एप्रिल २००१ रोजी हैदराबाद येथे कम्युनिस्ट पक्षाने 'जनशक्ती' या

अन्वयार्थ – दोन / २११