पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आंदोलननगरातच गुढ्या उभारून साजरा करण्यात आला आणि २४व्या दिवशी याच ६ एप्रिलला पहाटे एस.आर.पी.चे लोक आले होते. मला पकडून दूर नेल्यानंतर त्यांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यात बारा शेतकरी जागीच ठार झाले होते. त्या घनघोर आंदोलनात या म्हाताऱ्याने मला पाहिले असणार, कधीतरी भाकरी वाटून खाल्ली असणार, एकत्र पेज प्यायली असणार; या सगळ्या आठवणींनी त्याचे प्राण फुटू पाहत होते.
 पंचवीस वर्षापूर्वी स्वित्झर्लंडमधील जीवनाला रामराम ठोकून मी परत आलो. त्यानंतर किती सभा, किती बैठका; किती हजार मैलांचे प्रवास, किती तुरुंग आणि मनाला घरे पाडणारे कितीतरी अनुभव. या साऱ्यांच्या वेदना, लोकांचे हे प्रेम पाहिले म्हणजे बुजून जातात. कोण हे शेतकरी? कोण मी? मी ना यांच्या जातीचा, ना रक्ताचा. आजपर्यंत थोड्या का धुरीणांनी शेतकऱ्यांच्या कामासाठी जीव ओवाळून टाकले? पण त्यांतील बहुतेक 'नाही चिरा नाही पणती' असे उपेक्षेत इहलोक सोडून गेले. इतर दुर्भाग्य काही असो, लोकांचे प्रेम मिळण्याबाबतमात्र आपल्याला लॉटरी लागली आहे याची जाणीव झाली. लॉटरी लागण्याचा अभिमान तो काय असायचा? पण, मनात अहंकार अंकुरला, हे खरे!
 दुपारी बरोबर एक वाजता सभेला सुरुवात झाली. दिल्ली म्हणजे प्रचंड अंतरांचे शहर. येथे कोठूनही काहीही जवळ अंतरावर म्हणून नाही. पन्नासशंभर किलोमीटरमध्ये फारशी शेतीही नाही. शेतकरी मेळाव्यांत निम्मीअधिक गर्दी शंभर किलोमीटरच्या अंतरावरून येणाऱ्या शेतकऱ्यांचीच असते; येथे असे फारसे कोणी नाहीच. हरियानामध्ये गव्हाची कापणी चालू झालेली, त्यात पुष्कळ लोक अडकलेले. चौधरी देवीलाल अपोलो इस्पितळात शेवटच्या घटका मोजीत असल्याची बातमी पसरली, त्याचाही हरियानाच्या उपस्थितीवर परिणाम झालाच. मुख्य गर्दी आली ती महाराष्ट्र आणि गुजराथेतून. दोनतृतीयांश महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत. आदल्या दिवशी नागपूर भागात गारांचा पाऊस झाला. गुजराथवरही एकामागून एक संकटे कोसळत आहेत; पण या दोन राज्यांतील शेतकऱ्यांनी मैदान सारे भरून टाकले.

 राज्याराज्यांतील मान्यवर नेत्यांची भाषणे झाली. 'किसान कुंभा'त जमलेल्या साऱ्या संघटना या पहिल्यापासून खुल्या व्यवस्थेचा पाठपुरावा करणाऱ्या. 'एका दाण्यातून शंभर दाणे तयार करणारा शेतकरी स्वतः दरिद्री राहतो, कारण सरकारी व्यवस्थेची बाजारपेठेतील लुडबूड' हा त्यांचा मूलभूत सिद्धांत;

अन्वयार्थ – दोन / २०६